पेण (राजेश प्रधान ) ‘द – दारुचा नाही द- दुधाचा ’ नववर्षाचे स्वागत दारूने करू नका. त्या ऐवजी दूध पिण्याची सवय बाळगा, सिगारेट व फटाक्यांचे धूर काढून प्रदूषण करू नका असे आवाहन करित अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पेणच्या कोतवाल चौकात नागरिकांना दुध वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
दारु पिणे, विडी- सिगारेट असे व्यसन करणे वाईट आहे त्यामुळे आयुष्य आणि कुटूंब बरबाद होवू शकते. व्यसनाला अधिक बदनाम करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पेण शाखेतर्फे आयोजित करण्यात आला होता.
दारु व व्यसना करीता खर्च करीत असलेली रक्कम आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च करा त्यांचे भवितव्य घडवा तसेच व्यसनमुक्त होऊन आपले आरोग्य सुधारा असे मार्गदर्शन हबीब खोत यांनी यावेळी केले.
31 डिसेंबर म्हणजे मौजमजा करण्याचा दिवस म्हणून कित्येक जण साजरा करु लागले आहेत. मोैजमजा करायची म्हणजे दारु प्यायची, रात्रभर धिंगाणा घालायचा आणि बेधुंद व्हायचे. पहाटे घरी जावून भांडणे करायची हि विचित्र पध्दत बदलण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवून व्यसनमुक्ती व जनजागृती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती पेण शाखेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती सावनी गोडबोले यांनी दिली.
यावेळी संदेश गायकवाड, डॉ. सावनी गोडबोले, गीता भानुशाली, प्रा.सतीश पोरे, हबीब खोत, अश्विनी ठाकूर, जगदीश दंगर, चंद्रहास पाटील, नितीन कदम, एन. जे पाटील, सूर्यकांत पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.