पुणे – राज्यातील इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी शनिवारपासून संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांत अकरावी प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. करोनाच्या संकटामुळे आत्तापर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात दोन वेळा बदल करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
त्यानुसार महाविद्यालयांनी माहिती नोंदविली व त्याबरोबरच आपापली प्रवेश क्षमताही दर्शविली आहे. प्रवेश अर्जात चुका होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता 26 जुलैपासून सुविधा सुरू करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना लॉग-इन आयडी व पासवर्डही मिळाले आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरता येणार आहे. यात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती भरावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन शुल्कही विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेण्याचे कामकाजही तत्काळ सुरू करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-1 भरून झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी काही दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. मोबाइल ऍपद्वारेही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.
कटऑफ वाढणार
इ यत्ता दहावी निकालामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ वाढणार आहे. यंदा दहावीचा राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला. मागच्या वर्षी राज्याचा एकूण निकाल 77.10 टक्के होता. त्यामुळे ‘कट ऑफ’ वाढणार असल्याचे स्पष्ट आहे