‘अथर्व 4यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो’ लि. कडून कोटयवधींची फसवणूक

palkar14

पोलादपूर (शैलेश पालकर) : रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 28 कोटींची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या अर्थव 4यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महाड शहरातील कार्यालय बंद केल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या मॅच्युरिटीनंतर देय रकमांची पूर्तता करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, राज्यभरात 500 कोटींची फसवणूक झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी लॉकडाऊन काळात केलेल्या तक्रारअर्जानंतर मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकत्रित गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांविरोधात अटकेची कारवाई झाल्याने सद्यस्थितीत महाड व पोलादपूर तालुक्यातील गुंतवणूकदार या प्रकाराबाबत पुर्णपणे अंधारातच असून यात हातकी सफाई करणाऱ्या काही आकर्षक महिला एजन्टस आणि कर्मचाऱ्यांनी अन्य राजकीय सामाजिक तसेच अन्य क्षेत्रात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.

राज्यात सुमारे 500 कोटी रूपयांची गुंतवणूक विविध ग्राहकांनी केली. ग्राहकांना या गुंतवणुकीसाठी आकर्षित करताना अनेक आकर्षक योजनांसह काही अल्पशिक्षित सुंदर व्यक्तीमत्वाच्या गरजू व चलाख महिलांचा देखील उपयोग करण्यात आला होता. परिणामी, अनेकांनी योजनांच्या आकर्षणापोटी तर काहींनी चलाख महिलांच्या संवादातून गुंतवणूक केली. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण व दापोली तर रायगड जिल्ह्यात याच अर्थव 4यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महाड शहरातील कार्यालय सुरू केले होते. या कार्यालयामध्ये पोलादपूर तालुक्यातील हावरे येथील कर्मचारी तसेच पोलादपूर शहरातील एक महिला यांचा सातत्याने वावर होता. या कंपनीच्या गुंतवणूकपश्चात लाभाच्या योजनांच्या प्रभावाने महाड तालुक्यातील तसेच पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 1200 हून गुंतवणूकदारांनी सुमारे दीड ते दोन कोटी रूपयांची गुंतवणूक केली. पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली, कालवली, माटवण, हावरे तसेच धामणदिवी, भोगाव, सडवली, चोळई, कापडे, मोरगिरी तसेच अन्य भागातील शेतकरी असलेल्या गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय असून पोलादपूर शहरातील महिला मूळची ग्रामीण भागातील असल्याने तिने मोठया प्रमाणात महिलांना एकत्रित करून या महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली वेगळयाच प्रकारे गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा प्रकार सुरू केला. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी शेती व्यवसाय, शेळीपालन, शैक्षणिक, आरोग्य, सौंदर्यप्रसाधन, औषधे या क्षेत्रात कंपनीकडून गुंतवणूक होत असल्याचे सांगण्यात येत होते. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून दुप्पट आणि तीनपट परतावा देण्याचे आमीषही देण्यात आले. परंतू, मोठया प्रमाणात गुंतवणूक प्राप्त होऊ लागल्यानंतर संचालकांनी विविध भागात जमिनी आणि फ्लॅटस खरेदी करून गुंतवणूकदारांचा पैसा वापरण्यास सुरूवात केली आणि यातून काही पदाधिकाऱ्यांनी या अर्थव 4यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील आकर्षक महिलांना काही वेगळयाच स्वार्थासाठी प्रलोभने देऊन त्यांच्यामध्ये स्वेच्छानिर्मिती केली. याचदरम्यान, एजन्टस आणि बहुस्तरीय योजनेमुळे अनेकांनी एकमेकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित केल्यानंतर झालेल्या गुंतवणूकीचा सर्वात कमी कालावधीचा परतावा गुंतवणूकदारांना परत करणे गुंतवणूकदारांच्या पैशात वारेमाप मौजमजा करणाऱ्या संचालकांना अशक्य झाल्याने त्यांनी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून पोबारा केला. मात्र, या संचालकांच्या निकटवर्तीय महिलांसह काही कर्मचाऱ्यांनी बुडत्या कंपनीमध्ये मोठया प्रमाणात हात मारून स्वार्थ साध्य केला. रत्नागिरी तालुक्यातील केळये गावातील एका गुंतवणूकदाराचा तक्रार अर्ज रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये लॉकडाऊन काळात ऑक्टोबर 2020 मध्ये प्राप्त झाल्यानंतर अधिक तपास करता पोलीसांना चिपळूण, दापोली आणि महाड येथील अर्थव 4यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची कार्यालये बंद असल्याचे दिसून आले. यानंतर पोलीसांनी अर्थव 4यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक सूरदास पाटील, सुखदेव म्हात्रे व सुभाष नाईक यांना दहिसर येथून 22 ऑक्टोबरला अटक करून कंपनीचे संचालक शिवाजी निकाडे, गणेश हजारे, सचिन गोसावी व मुकेश सुदेश यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील कार्यालय बंद झाल्यानंतर तातडीने महाड शहरातील कार्यालयही बंद करून गुंतवणूकदारांना आता गुंतवणूकीचे उद्दीष्ट संपले असून गुंतवणूकदारांना पाच वर्षांनंतर त्यांच्या पोस्टाच्या पत्त्यावर धनादेश प्राप्त होतील, असे सांगण्यास सुरूवात झाली. परंतू, रत्नागिरी जिल्ह्यातील अर्थव 4यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची कार्यालये बंद झाल्याची चर्चा पोलादपूर तालुक्यात झाल्यानंतर पोलादपूर शहरातील महिलेच्या घरी काही गुंतवणूकदारांनी जाऊन रक्कमेची मागणी केली. यादरम्यान, सदर महिलेने एका राजकीय पक्षामध्ये जाळे पसरविण्यास सुरूवात केल्याने एक पदही काही दिवस पदरी पाडून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही गुंतवणूकदार महिलेच्या गावातीलच असल्याने तिने पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर रक्कमांचा परतावा होईल, असे सांगून वेळ मारून नेली आहे. सदर महिलेने तिच्या संपर्कात आलेल्या काही राजकीय धेंडांच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य व्यक्तींसाठी एका अलिशान हॉटेलमध्ये बडदास्त ठेवल्याची चर्चा ‘अथर्व’ चे काही तत्कालीन कर्मचारी करीत असून अथर्वमधील चिपळूण आणि दापोली येथे वास्तव्य असलेल्या एका बडया व्यक्तीने महाड तालुक्यातील एका व्यावसायिकामार्फत तिच्यासाठी सामाजिक क्षेत्रात वावरण्याची संधी निर्माण केली असल्याची माहिती त्यांच्याकडून प्राप्त होत आहे.