माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानमध्ये विकास कामे पूर्ण करत असताना एमएमआरडीए ठेकेदारांकडून रस्त्याची कामे करताना रेती, खडी, सिमेंट, ग्रीट च्या गोणी जंगलात फेकून दिल्या होत्या. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी या प्लास्टिक कचऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर माथेरान अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तसेच संबंधित एमएमआरडीए ठेकेदारांना सूचना केल्यावर जंगलातील अस्ताव्यस्त पडलेल्या प्लास्टिक गोणी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
जवळपास हजारो गोणी जमा झाल्या आहेत. एमएमआरडीए च्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कामे पूर्ण केली जात आहेत. परंतु याकडे नगरपरिषदेच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे संबंधीत ठेकेदाराने जंगलात गोण्या टाकलेल्या आहेत. यावर कुणाचाही अंकुश नसल्याने माथेरानची वनसंपदा धोक्यात आणली जात आहे. घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारांचे कामगार सुध्दा कामे करतात की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
या ठेकेदारांना नेहमीच एकप्रकारे पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो असेही बोलले जात आहे. अधिकारी वर्गाने आपल्या पदाचा उपयोग योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. कामगारांकडून वेळच्या वेळी कामे पूर्ण करून घेणे ही अधिकारी वर्गाची भूमिका असताना उगाचच ठेकेदारांच्या कामगारांना गोंजारने ही पूर्णपणे चुकीची बाब आहे. त्यामुळेच अशाप्रकारे कचऱ्याचे साम्राज्य जंगलात पहावयास मिळते असे बोलले जात आहे.