उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात अनधिकृत बॅनर हे प्रवाशांची व नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.
उरण तालुक्यातील उरण ते पनवेल या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर लावण्यात आलेले आहेत. मात्र या अनधिकृत बॅनर वर प्रशासनातर्फे कोणतेही कारवाई होताना दिसून येत नाही.
उरण तालुक्यातील नवीन शेवा बस स्टॉप जवळ असलेल्या जय शिवराय चौकात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर लावण्यात आलेले आहेत. अनेक दिवस हे बॅनर तसेच होते. प्रशासनामार्फत कोणतेही कारवाई होत नव्हती. रस्त्याच्या मधोमध बॅनर लावल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होत होता. तर अनेक वाहनांची अपघात होता होता वाचली.
सदर अनधिकृत बॅनर मुळे नागरिकांना, प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता जय शिवराय चौकातील अनधिकृत बॅनर शिवप्रेमी युवकांनी काढून टाकले. व चौक व रस्ता मोकळा केला. अशाच प्रकारे उरण मधील चारफाटा येथे चौकात अनधिकृत बॅनर अधून मधून लावण्यात येतात अशा अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.