अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी आमिषास बळी पडू नये : प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव

पेण : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठी असणाऱ्या विविध सामूहिक व वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी या कार्यालयाकडे संबंधित अर्ज विनामूल्य उपलब्ध असतात. कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती अथवा दलालाकडून सामूहिक अथवा वैयक्तीक योजना अर्जासाठी किंवा मंजुरीसाठी प्रलोभन/आमिष दाखविले जात असल्यास अशा प्रलोभनांना/ आमिषांना अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी बळी पडू नये, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव यांनी केले आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जिल्हा रायगड या प्रकल्पांतर्गत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामधील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो तसेच करोना च्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे मोफत उदरनिर्वाहासाठी लाभ देण्यात येतो.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठी सामूहिक व वैयक्तिक तसेच इतर विविध योजनांचा लाभ शासनाच्या उपलब्ध निधीच्या अधीन राहून योजनांच्या निकषाप्रमाणे देण्यात येतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभधारकांच्या मागणीप्रमाणे व शासनाच्या अटी व शर्तीनुसार अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठी विनामूल्य अर्ज या कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येतात. कोणत्याही त्रयस्थ संस्थेस अथवा त्रयस्थ व्यक्तीस हे विनामूल्य अर्ज अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना वाटप करण्यासाठी देण्यात येत नाहीत.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जिल्हा रायगड या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अनुषंगाने विविध सामाजिक व वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी कोणतीही त्रयस्थ संस्था अथवा त्रयस्थ व्यक्ती या लाभधारकांसाठी योजना मंजूर करून आणतो, असे भाष्य करत असेल अथवा या कार्यालयाकडे उपलब्ध असलेले विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उपलब्ध असलेले अर्ज हे विकत मिळत असल्याचे खोटे सांगून अनुसूचित जमातीच्या लाभधारकांची फसवणूक करण्याचे प्रयत्न केले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती अथवा दलालाकडून सामूहिक अथवा वैयक्तीक योजना अर्जासाठी किंवा मंजुरीसाठी प्रलोभन/आमिष दाखविले जात असल्यास अशा प्रलोभनांना/ आमिषांना अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी बळी पडू नये, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव यांनी केले आहे.