वैदेहीच्या सगळ्या मैत्रीणि आज तिच्या घरी आल्या होत्या. जवळपास दहा वर्षांनी त्यांची अशी भेट होत होती. वैदेही खुप एक्साईटेड होती.. तिने घर आवरलं, खायला छान वेगवेगळे पदार्थ केले. तिचा नवरा राकेशही तिला आनंदी बघून खुश होता.
वेळ झाली.. मैत्रीणि आल्या… सगळ्या एवढ्या वर्षांनी भेटल्या मुळे गप्पांमधे रंगून गेल्या.. राकेश ची ओळख वगैरे करून दिल्यावर राकेश बेडरूम मधे निघुन गेला.. आणि लॅपटॉप वर त्याचं काम करत राहीला.
इकडे वैदेही आणि तिच्या मैत्रीणि गप्पांमधे रंगल्या होत्या.. जुन्या आठवणी आठवून एकमेकिंना हसवत होत्या.. छेडत होत्या..
राकेशला चहा प्यायची इच्छा झाली.. तो वैदेहीला चहा करतेस का विचारायला आला… त्यावर तिने थोड्या वेळात करते सांगितलं…
राकेशला तिने लगेच उठून चहा करणं अपेक्षित होतं… तो नाईलाजाने किचन मधे गेला.. एरवी दोघेच असताना तो कित्येकदा चहा बनवून घेत असे.. वैदेहीला देखील देत असे..
पण “आज तिच्या मैत्रीणिंसमोर तिने मला नकार दिला!” ही गोष्ट त्याला खटकली!
तेवढ्यात वैदेही किचन मधे आली, म्हणाली.. ” अरे मी येतच होते.. मी करते चहा…तू बस..”
तिला सगळ्यांसाठी चहा करताना बघून त्याला पुन्हा वाईट वाटलं..
“माझ्यासाठी चहा करायला हिच्याकडे वेळ नव्हता.. पण मैत्रीणिंसाठी चहा करायला ही स्वतः आली! म्हणजे आधी सगळ्यांसमोर माझा अपमान केला, आणि नंतर मला एवढ्या जणांचा चहा बनवता येत नाही असं बोलून आली असेल..!!” असे विचार राकेशच्या डोक्यात फिरू लागले.. राकेशच्या नजरेत चार चौघांत त्याचा अपमान झाला होता…
हा वार त्याच्या जिव्हारी लागला होता. आणि तेव्हा पासून राकेश आणि वैदेहीच्या संसारात छोटे छोटे बेबनाव सुरु झाले. म्हणायला लव मॅरेज होतं.. पण आता त्यात लव कुठेच दिसेना!
कारण?
राकेशला वाटलं की त्याचा तिच्या मैत्रीणिंसमोर अपमान झाला.. पण वास्तविक अपमान झाला तो त्याच्या मनात!
असं आपल्या सोबतही अनेकदा होतं… एखादी गोष्ट आपण मनाला लावून घेतो.. आणि आपणच ठरवतो, की आपला अपमान झाला… !
कधी कधी भांडण झाल्यावर एखादी व्यक्ति आपल्याला एखादी शिवी देते.. आपण ती शिवी, तो प्रसंग मनात वारंवार घोळवत राहतो.. शिवी देणारा एकदाच शिवी देऊन जातो.. पण आपण मनात ती सारखी घोळवत राहून स्वतः ला अनेक वेळा ती च शिवी देऊन घेतो..!
म्हणजे खरं वाईट ती व्यक्ति आपल्यासोबत वागत नसून आपणच आपल्या सोबत वागतो!
आपला अपमान आपणच जास्त करत असतो..
म्हणून कधी कधी काही गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्याव्या… त्याने पुढील आयुष्य सोप्पं होतं..!
– के. एस. अनु