अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर

मुंबई : अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला असल्याची माहिती फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन दिली आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याला लंग कॅन्सर झाला आहे. त्याला लवकर आराम पडो असंही नाहटा यांनी म्हटलं आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे.

शनिवारी संध्याकाळी संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय दत्तची करोना चाचणीही झाली, तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

संजय दत्तने शनिवारी एक ट्विट केलं होतं, त्यात म्हटलं होतं की, नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन.