अलिबागमध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक, पनवेलनंतर दुसरा नंबर

पेण (सुदर्शन शेळके) : रायगड जिल्ह्यात गणपती सणानंतर पुन्हा एकदा कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. लोकसंख्या जास्त असल्याने पनवेल शहर आणि ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत, परंतु पनवेल वगळता रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रूग्ण अलिबाग शहर आणि तालुक्यात असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. तसेच पनवेल वगळता रोज अलिबागमध्ये सर्वात जास्त नवे रूग्ण सापडत आहेत.

अलिबागमध्ये सध्या कोरोना अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 668 आहे. तर दररोज नवीन रूग्ण सापडण्याच्या बाबतीतही जिल्ह्यात अलिबाग हे पनवेलनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. काल अलिबागमध्ये 101 नवीन रूग्ण सापडले आहेत. पनवेल वगळता ही संख्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत खुपच जास्त आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कालपर्यंत अलिबाग तालुक्यात 1 हजार 970 रूग्ण बरे झाले आहेत. मात्र, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अलिबागच्या तुलनेत पेणमध्ये थोडे जास्त आहे. मागील सहा दिवसांमध्ये पनवेल वगळता संपर्ण जिल्ह्यात अलिबागमध्ये नवे रूग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील सहा दिवसात केवळ एक दिवसात पेणमध्ये अलिबागपेक्षा जास्त नवे रूग्ण सापडले आहेत. पेण तालुका सुद्धा अलिबागनंतरचा दुसरा सर्वात प्रभावित तालुका आहे.

आलिबागमध्ये मागील 6 दिवसात सापडलेले कोरोना रूग्ण :

* दिनांक 2 सप्टेंबर – 91
* दिनांक 3 सप्टेंबर – 56 – (पेणमध्ये 90 रूग्ण सापडले)
* दिनांक 4 सप्टेंबर – 123
* दिनांक 5 सप्टेंबर – 109
* दिनांक 6 सप्टेंबर – 100
* दिनांक 7 सप्टेंबर – 101