अलिबाग : स्थानिक आणि पर्यटकांचे श्रध्दास्थान असलेले कार्लेखिंड येथील पात्रुदेवी मंदिर चोरट्यांनी फोडले असून देवीची मूर्ती आणि इतर साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग येथे जात असतांना कार्लेखिंड येथे पात्रुदेवीचे मंदीर आहे. या ठिकाणी बुधवार दि. ११ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील मूर्ती व इतर साहित्य चोरुन नेले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे हे करीत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अलिबाग चौल येथील दत्त मंदिरातून चांदीचा गाभाराच चोरुन गेल्याची घटना घडली होती. त्याचे सारे चित्र CCTV मध्ये कैद झाले असून अद्याप तरी पोलिसांना चोर शोधण्यात यश आलेले नाही. सद्या चोरट्यांनी मंदिरांनाच टार्गेट केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.