रोहा : रविवार 26 जुलै 2020 रोजी रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला 12 तासांच्या आत रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी ताम्हणी शेत गावच्या जवळ वावल्याचा कोंडाच्या मध्यभागी मोठ्या दगडावर विवस्त्र आवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. मृत मुलगी ही कबड्डी आणि कराटेपटू होती. त्यामुळे घटनेमध्ये एकापेक्षा अधिक आरोपी असावेत अशी चर्चा सुरू आहे.
अतिप्रसंग करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीला मारण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत मुलीच्या डोक्यात दोन जखमा आहेत. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील विविध गुन्हे उघडकीस आणणार्या अधिकार्यांच्या नेतृत्वात आठ पथके तयार करून तपास सुरू केला होता. यानंतर पोलीसांना आरोपीला पकडण्यात यश आले. केलेल्या कृत्याची आरोपीने कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीचा मृतदेह मुंबई येथील जे. जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.