अवकाळी झालेल्या पावसाने आंबा बागा वाचविण्यासाठी कृषी विभागाने दिला कीटकनाशक फवारणीचा सल्ला

aamba

अलिबाग : अवकाळी झालेल्या पावसामुळे आंबा बागांचे कीड व रोगांच्या प्रादूर्भावाने नुकसान होऊ नये, त्यासाठी याेग्य कीटकनाशकांचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

पाऊस झालेल्या आंबा बागांमध्ये कीड व रोगांच्या प्रादूर्भावाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. आंबा पालवीवरील तुडतुडयांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के प्रवाही 3 मिलिलीटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. आंबा पालवीवरील फुलकिडयांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास थायोमेथॉक्झाम 25 टक्के 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. ही कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत.

लाल कोळीच्या व्यवस्थापनाकरीता 80 टक्के सल्फर 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पानांच्या मागे औषध पोहोचेल,अशा पध्दतीने फवारणी करावी.
पाऊस झालेल्या आंबा बागांमध्ये भुरी व करपा रोगांच्या प्रादूर्भावाची शक्यता आहे. भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के हेक्झाकोनॅझोल 5 मिलिलीटर किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेडॅझीम 12% + मॅन्कोझेब 63% + 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.