अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात एक 10 वर्षांची आदिवासी मुलगी गंभीर भाजली आहे. घरात घुसलेल्या दोघांनी तिच्या आईला जाळण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. आमच्यावर दाखल केलेली बलात्काराची केस मागे घे अशी धमकी महिलेला देत या आरोपींनी जळीतकांड घडवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पारनेर तालुक्यात 13 ऑगस्टरोजी घडलेल्या या भयंकर प्रकारानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीच्या साथीदाराला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी फरार आहे. गंभीर भाजलेल्या मुलीवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींची नावे राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा. पळवे खु) अशी आहेत.
राजाराम आणि अमोल यांनी गुरुवारी वाघुंडे शिवारातील महिलेच्या घरात प्रवेश केला. राजारामने तिला धमकावले आणि दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास सांगितले. यावेळी 10 वर्षांची मुलगी देखील आईजवळ होती. एका आरोपीने महिलेवर पेट्रोल टाकले, त्यातील थोडे मुलीच्या अंगावर उडाले. त्याच वेळी, अमोल तरटेने मॅचिस पेटवून महिलेच्या अंगावर फेकली. पण, मॅचिसची जळती काडी मुलीच्या फ्रॉकवर पडली ज्यामुळे तिच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला.
या दोन्ही आरोपींविरूद्ध सुपे पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 14 ) रात्री 11 वाजताच्या सुमारास भादवि कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) आणि अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमोल तरटे यास अटक केली असून राजारामचा शोध पोलिस घेत आहेत.