मुंबई : राज्यात आता लॉकडाऊनमध्ये हळूहळू आता शिथिलता देण्यात येत असून लवकरच आंतरजिल्हा एसटीसेवा सुरू होईल. पुढील आठवडय़ात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.
कोरोनाच्या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी राज्यात प्रवासी वाहतूक बंद करण्याबरोबर आंतरजिल्हा बससेवा बंद करण्यात आली होती. पण आता मिशन बिगिन अंतर्गत जिल्ह्यामध्ये बससेवा सुरु केली आहे. ही सेवा सुरु करताना मास्क, शारिरीक अंतर अशी बंधने घातली आहे. आता लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरु होईल. एसटीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा मंत्री म्हणून मी त्यांचीशी चर्चाही केली आहे. ही बससेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे असे वडेट्टीवार म्हणाले.