पोलादपूर(शैलेश पालकर) : शहरातील दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची दुरूस्ती करून उपजिविका साधणाऱ्या मुलाने त्याच्या आईच्या कृपाछत्राखाली मिळणारी सावली हरपल्यानंतर तेरावे उत्तरकार्यप्रसंगी उपस्थित समाजबांधव आप्तपरिवार आणि शोकाकूल जनांना डेरेदार आम्रवृक्ष होईल अशा स्वरूपाची आंब्यांची कलमी रोपांचे वाटप केले. यामुळे समाजासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी इच्छाशक्तीची देखील गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.
पोलादपूर शहरामध्ये संदीप किसन शिर्के हा मोटारमॅकेनिक तरूण त्याची आई, पत्नी व मुला-बाळांसोबत राहून मेहनतीने उपजिविका करीत असताना त्यांच्या कुटूंबियांवर आई शालन किसन शिर्के या 65 वर्षीय माऊलीची मायेची सावली कायम होती. अचानक आईचे निधन झाल्यानंतर आईची मायेची सावली हरपलेला मुलगा संदीप आणि त्याची पत्नी शोभा संदीप शिर्के या उभयतांनी आईच्या सावलीची आठवण चिरंतन ठेवण्यासाठी तेराव्याच्या कार्यासाठी आलेल्या शोकाकूल आप्तपरिवारासह ग्रामस्थांना भोजनापूर्वी प्रत्येकी एक आम्रवृक्षाचे कलमी रोप भेट देत आईची आठवण सर्वांच्या मनात आणि अंगणात कायम राहण्यासाठी मनोकामना केली.
गरीबी आणि कष्टातून प्रामाणिकपणे सर्वपरिचित झालेल्या संदीप शिर्के या तरूणाने मातृवियोगाच्या दु:खातही समाजोपयोगी उपक्रम राबवून वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.