अलिबाग : दैनंदिन नागरिकांचा व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंप इत्यादींशी सतत संपर्क येत असतो. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपचालक यांनी त्यांच्या व इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने स्वखर्चाने त्यांची स्वत:ची तसेच त्यांच्या दुकानामध्ये काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट तात्काळ करून घ्यावी आणि त्याबद्दलची माहिती संबंधित नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी व तहसिलदार यांच्याकडे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता जास्तीत जास्त बाधित व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शासनाने जास्तीत जास्त नागरिकांच्या अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटना तसेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थान परिषद यांच्याद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन तसेच शासनाच्या सूचनांप्रमाणे हँड सॅनिटायझरचा वापर, नाक व तोंडाला मास्क लावणे, फिजिकल डिस्टिसिंग पाळणे या बाबींचे देखील दैनंदिन जीवनात पालन करणे महत्त्वाचे आहे.