आगामी ‘या’ नगरपंचायत निवडणुकीमध्ये मनसेची भाजपसोबत वाटचाल?

palkar15

पोलादपूर (शैलेश पालकर) : शहरातील घनकचरा विल्हेवाट लावण्यासंदर्भात सक्षम यंत्रणा उभारण्याकडे दूर्लक्ष केल्याने पोलादपूर नगरपंचायतीला हरित लवादाकडून 8 लाखांचा दंड आकारण्यात आल्यानंतरही याकामातील ठेकेदारीत काळंबेरं असल्याच्या शक्यतेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन या घनकचरा प्रश्नी काढण्यात आलेली निविदा रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या आगामी दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मनसेची भाजपासोबत वाटचाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनसेचे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर यांनी गेल्या वर्षी पोलादपूर नगरपंचायत मुख्याधिकारी पद रिक्त असल्याच्या मागणीसाठी उपोषण केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून नगरपंचायतीच्या कामकाजातील अनागोंदी कारभार उघड करण्यासाठी पाठपुरावा करण्यास सुरूवात केली आहे.

पोलादपूर नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम शंकास्पद असल्याचा दावा यावेळी दर्पण दरेकर यांनी केला असून ओला व सुका कचरा यांचे विलगीकरण तसेच विल्हेवाट लावण्याचे काम केले जात नसून कर्मचारी राहिलेल्या ठेकेदाराच्या कामाची मुदत संपल्यानंतर सप्टेंबर 2020 पासून नगरपंचायतीने विनानिविदा सुरू ठेवले आहे. आधीच्या निविदेमध्ये नगरपंचायतीचे वाहन वापरण्यास देण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नसताना कोरोना संसर्ग काळात घनकचरा संकलनकामी नगरपंचायतीचे कर्मचारी आणि वाहनदेखील वापरण्यात आल्याचे मनसे शहर अध्यक्ष दरेकर यांच्याकडून प्रशासक प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची भेट घेऊन सांगण्यात आले आहे.

मात्र, याकामाचे बिल काढण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतल्यास मनसेकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्याची भूमिका यावेळी दर्पण दरेकर यांनी व्यक्त केली. कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात येते का, असा सवाल यावेळी उपस्थित करताना कामगारांची इएसआयसी नोंदणी करण्यात आली आहे काय, अशीही विचारणा यावेळी करताना स्वच्छ सर्वेक्षण 2021 द्वारे नागरिकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात येत असताना पोलादपूर नगरपंचायतीने शहरातील अस्वच्छतेकडे अक्षम्य दूर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी मनसे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी केला.

शहरातील मनसेकडून हा प्रसिध्दीचा स्टंट केला जात असल्याची चर्चा सहेतूकपणे घडविली जात असताना अचानक भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे यांच्यासमवेत मनसे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी अचानक विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांची सदिच्छा भेट घेऊन नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे, प्रशासक प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड तसेच मुख्याधिकारी यांना दिलेले निवेदन देऊन घनकचरा संकलनाची निविदाच रद्द करण्यासाठी पाठपुराव्याची मागणी केल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या घनकचऱ्याचा विषय ऐरणीवर आला आहे.

याचसोबत पोलादपूर नगरपंचायतीच्या आगामी दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मनसे आणि भाजपा एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात या भेटीकडे वेगळयाच समीकरणाच्या शक्यतेने पाहिले जात आहे. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मनसेने काँग्रेस-शेकापक्षसोबत आघाडीमध्ये सहभाग घेऊनही काही प्रभागात काँग्रेसच्या उमेदवारांसोबत मैत्रीपूर्ण लढत दिली होती. यानंतर सह्याद्रीनगर प्रभागामधील पोटनिवडणुकीमध्ये मनसेने स्वतंत्ररित्या लढत दिली होती. मात्र, नगरपंचायतीमध्ये चंचूप्रवेश न झाल्याने आता मनसेने घेतलेल्या वेगळया भूमिकेमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत.