आजही जाणता राजा सर्व धर्मियांच्या पोटाची भरतो खळगी

rajesh

पेण ( राजेश प्रधान ) : महाराष्ट्राचे दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाजारात भगव्या पताका, झेंडे व गाडीवर लावण्याकरिता फ्लॅग विक्रीकरिता आले आहेत. पुणे येथील मेहबूब हमीद मदारी हे जातीने मुस्लीम आहेत. वय वर्ष 75 असलेल्या मेहबूब मदारी यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यात करिता छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हाती घेतला आहे. 80 रुपयांपासून 250 रुपयां पर्यंतच्या भगव्या झेंड्याची विक्री करून हमीदभाई दिवसाला 300 ते 400 रुपयांपर्यंत पर्यंत कमाई करतात.

ज्या योगे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पेण तालुक्यात झेंडे फटाके यांची विक्री करणारे 2 दुकानदार आहेत. दोघेही हिंदू आहेत. त्याच प्रमाणे शहरांमध्ये काही लहान मुलेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याची विक्री करताना दिसत आहेत. ही लहान मुले दक्षिण भारतीय आहेत. थोडक्यात शिवजयंतीच्या निमित्ताने आजही जाणता राजा सर्व धर्मियांच्या पोटाची खळगी भरताना दिसत आहे.