सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “आता समजायलाच हवं”

दिव्या – तेरा चौदा वर्षांची – शाळेत जाणारी मुलगी… घरी एक मोठा भाऊ.. आणि आई आणि वडील असे दोन्ही रोल निभावणारी तिची आई…
आईचं वय साधारण तीस- पस्तीस वर्षे..

दिव्या सात आठ वर्षांची असताना दिव्याच्या वडिलांपासून वेगळं झाल्यापासून दिव्याच्या आईला खुप अडचणींना तोंड द्यावे लागले.. नवऱ्याने सोडलेली बाई.. असं लोकांच्या नजरेत दिसायचं…
पण सत्य परिस्थिती फक्त दिव्याला, तिच्या भावाला आणि तिच्या आईलाच माहीत होती…
दिव्याचे वडील रोज तिच्या आईला कोणते ना कोणते कारण काढून मारत होते… तिने पंधरा वर्षे रोज मार, भांडण सहन केलं होतं… पण जेव्हा त्यांनी दोन्ही मुलांवर हात उचलला.. दिव्याच्या आईने सहन केले नाही… “जो त्रास मी सहन केला.. तो माझी मुलं सहन करणार नाहीत…!”
तिने मनाशी ठाम निर्णय केला.. आणि दिव्याच्या वडिलांना डिवोर्स दिला. मुलांचे रडणं, घाबरणं एक आई म्हणून तिला कधीच मान्य नव्हतं…

दिव्याच्या आईने वेगळं होताच, दिव्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.. कदाचित त्या कारणामुळेच ते दिव्याची आई आणि दोन्ही मुलांना त्रास देत असावे…

आता दिव्याच्या आईने एकटीने लढण्याचा निर्णय घेतला होता.. दुसरं कोणीही तिच्या मुलांना ते प्रेम देऊ शकत नाही, हे ती जाणून होती.. म्हणून तिने स्वतः चा बिजनेस करून मुलांना वाढवण्याची जबाबदारी उचलली..

तिच्या फूड बिजनेस मधे अनेक लोकांशी तिचा संपर्क व्हायचा.. कधी दिवाळीच्या ऑर्डर्स.. कधी जेवणाच्या, किटी पार्टी, फराळ.. अनेक प्रकारच्या ऑर्डर्स…. अनेक प्रकारचे लोक….

दिव्याला समजायला लागलं होतं.. की आपण खुश असलो की आई खुश असते.. म्हणून दिव्या नेहमी आईसमोर हसुन खेळुन असायची.. सगळं काही व्यवस्थित वाटत होतं…

आणि एक दिवस.. दिव्याच्या आईचं अंथरूण ओलं झालं….
तिच्या आईला झोपेत अंथरुणावरच सुसू झाली होती.. दिव्या साठी ही गोष्ट नवीन होती….
तिला वाटलं आईला कंट्रोल झाला नसेल… म्हणून सुसू झाली… दिव्याने ती गोष्ट हसण्यावारी नेली… आईही काही बोलली नाही….
मग ही गोष्ट जवळपास सारखीच घडायला लागली.. रोज दिव्या च्या आईचं अंथरुण ओलं होत होतं… दिव्या हसायची.. पण तिला आईच्या नजरेतलं गिल्ट दिसत नव्हतं…
शेवटी एक दिवस.. तिचा भाऊ तिला ओरडला… “आई आजारी आहे.. म्हणून असं होतंय… हसू नकोस.. “

आणि त्या दिवसा पासून दिव्याने ती गोष्ट खुप साधी आहे.. त्यावर काय हसायचं.. असा हावभाव ठेवला… त्यामुळे आईला ही जरा बरं वाटू लागलं… आणि थोड्याच दिवसात आईला बरं वाटू लागलं…

पुढे दिव्या मोठी झाली… तिचं लग्न झालं… आयुष्य आई शिवाय कसं जगावं हे तिला शिकावं लागलं… सासरी नवीन लोक.. नवीन रीती… आईच्या घरा सारखं काहीच नाही…. हळू हळू काही मानसिक ताण, नात्यांतले तणाव.. आणि डिप्रेशन… यामुळे दिव्या खचत चालली होती.. आणि एक दिवस…. दिव्याचं अंथरुण ओलं झालं…!

त्या दिवशी तिला समजलं… तिची आई किती मोठ्या मानसिक धक्क्यातुन जात असेल… पूर्ण समाजाला तोंड देताना मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणारी.. डोक्यावर टेंशनचा भार असून ही… मुलांना त्याची जराही ही कल्पना येऊ दिली नव्हती आईने…

आज जेव्हा दिव्या तिच्या आईच्या वयाच्या त्याच टप्प्यावर पोहोचली … तेव्हा तिला आईचा त्रास समजला..!

आपल्या अजुबाजुला, आपल्या घरातही अशी घटना घडू शकते… काही वेळा मुलं आई वडिलांना समजून घेतात… काही वेळा चिडचिड करतात… काही घालून पाडुन बोलतात…
पण आता आपला दृष्टिकोन बदलायला हवा…
त्यांच्या वयात ते कोणत्या शारीरिक, मानसिक अवस्थेतुन जात आहेत हे दरवेळी ते सांगू शकत नाहीत.. म्हणून आता आपणच समजून घ्यायला हवं… त्यांच्या वयाचे झाल्यावर समजण्यापेक्षा आत्ताच समजलो.. तर त्याचं जगणं सोप्पं होईल…

  • के. एस. अनु