आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी ठरेल : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

thane2

ठाणे : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारिरीक आंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर प्रभावीपणे करत रहाणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कोणही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर ठाणे  जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे,जिल्हा नियोजन अधिकारी ए.ए.खंदारे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंगे, क्षेत्रीय प्रचार सहायक सदाशिव मलखेडकर,तहसिलदार राजाराम तवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 16 व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसीकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो,महाराष्ट्र व गोवा विभाग यांच्या वतीने ठाणे  जिल्ह्यातील सर्व  तालुक्यातील गावांमध्ये 10 दिवस व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे. आनंद तरंग फाऊंडेशन व शाहीर उत्तम गायकर यांच्यावतीने हे लोककला कार्यक्रम सादर करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकारकरीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.