“अगं, किमान तुझ्या आई वडिलांचा तरी विचार कर…! तुझ्याशिवाय ते कसे जगतील?”
स्मिता तिच्या रूममेट प्रियाला समजावत होती…
“प्लीज स्मिता.. मला दूसरा कोणताही विचार करायचा नाहीये.. माझा विजय मला सोडून गेला… आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही..! म्हणून मी आत्महत्या करतेय.. मला प्लीज अडवू नकोस…!”
स्मिताला प्रचंड राग आला.. तिने प्रियाला टेरेसच्या कडया वरुन खाली ओढले.. आणि एक चपराक लगावून दिली…
प्रियाला क्षणभर कळेच ना.. की नेमके झाले काय…!
“अगं, मरणं इतकं सोप्पं वाटतं का तुला? सहा महीने नाही झाले त्याला तुझ्या आयुष्यात येऊन.. आणि तू इतकी गुंतलीस, की स्वतः च्या आई वडिलांचा विचार सुद्धा तुझ्या मनात आला नाही??? तू एवढी त्या विजय वर प्रेम करतेस म्हणतेस.. तो ही करत होता ना? कि त्याच्या बाजूने टाईम पास होता फक्त??? दूसरी मिळाल्यावर तुला सोडूनच गेला ना??
अगं, तू मेलीस तर विजयला काही फरक पडणार नाही… पण तुझ्या आई वडिलांना पडेल..!
सहा महिन्यांच्या प्रेमाखातर तू तुझ्या आई वडिलांनी वीस वर्ष लावलेला जीव, केलेलं प्रेम सगळं इतक्या सहज विसरलीस????
लाज नाही वाटली तुला???
आणि मला सांग.. तुला आत्महत्या करायची आहे ना??? ह्या तिसऱ्या मजल्या वरुन उडी मारून तू मरशील??? हातपाय तुटले, डोकं फुटून कोमात गेलीस… तर भोगावं कोणाला लागणार??? तुला आणि तुझ्या घरच्यांना??? की दुसऱ्या पोरी साठी तुला सोडून गेलेल्या विजयला??? जरा विचार कर प्रिया.. म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल..” स्मिता आत्मीयतेने प्रियाला सांगत होती…
कित्येकदा आपण किंवा आपल्या आजुबाजुचे, आपले मित्र, मैत्रीण… अशा प्रकारच्या अनेक अपयशांमुळे.. म्हणजे कधी आर्थिक परिस्थिती.. कधी असं कोणी सोडून जाणं.. कधी ऑफिसचं टेंशन, बायकोची कटकट.. नवऱ्याचे व्यसन करणं, संशय घेणं.. सासरच्यांचा जाच… किंवा अगदी परीक्षेत नापास होणं…ह्या सगळ्यातुन डोक्यात वाईट विचार येऊ शकतात.. आणि ते वाईट विचार आपल्या मनावर एवढे परिणाम करतात.. की त्या वाईटा पुढे आपल्या आयुष्यातल्या सुंदर गोष्टी, आपल्याला जीव लावणारी माणसे आपल्याला दिसेनाशी होतात…!
आणि आपण आत्महत्येचा निर्णय घेतो.
अशा वेळी आपणच स्वतः ला जपायला हवं.. आपल्याला जन्म देणाऱ्यांना न विसरता.. आपण कशात चांगले आहोत हे स्वतःला सांगायला हवं…
एखादी व्यक्ति जर सोडून गेली.. तर तिच्यासाठी जीव देण्या ऐवजी आपल्या आयुष्यात अजुन अनेक व्यक्ति आहेत, फ्रेंड्स आहेत.. त्यांचा विचार करायला हवा…
नोकरी मध्ये त्रास होत असेल, तर जीव देण्या ऐवजी तो त्रास कसा कमी करता येईल ह्याचा विचार करायला हवा.. किंवा जर तो त्रास कमी करता येत नसेल तर दूसरी नोकरी, किंवा स्वतः चा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून प्रॉब्लेमला आळा घालता येऊ शकतो…
अभ्यासात कमी असु, परिक्षेत नापास झालो, तर पुन्हा परीक्षा देता येतेच की!
आत्महत्या करून, मरून कोणताच प्रॉब्लेम सॉल्व होत नाही.. उलट आपल्या जबाबदाऱ्या सोडून आपण पळ काढला असं आपण मानायला हवं.
आणि मरायला जेवढी हिंमत लागते ना, त्याच्या एक टक्का जरी हिंमत जगण्या साठी दाखवली.. तर आयुष्य खुप सुंदर होतं…
– के. एस. अनु