मुंबई : शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी माझा परिचय नाही. आतापर्यंत त्यांना कधीही भेटले नाही, असे स्पष्टीकरण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने मंगळवारी एका निवेदनात केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी रिया व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध बिहार पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या गुन्हाचा तपास सीबीआय, ईडी करत आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान राजपूत कुटुंबीयांच्या वकिलांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले आहे. भाजप नेत्यांनीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध जोडून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपाचा भडिमार सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा खुलासा रियाने केला आहे. दरम्यान, आज बुधवारी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवावे की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे.