पेण (राजेश प्रधान) : ७५ वर्ष मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलेल्या व रेफ्यूजी सारखे जीवन जगत असलेल्या पेण तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी शुक्रवारी पेण पंचायत समितीवर धडक मोर्चा काढून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध ! या स्वतंत्राला झालयं काय आमच्या पर्यंत आलच नाय ! ये आजादी झुटी है देश की जनता भुकी है ! या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय ! अशा घोषणा देत पेण तालुक्यातील तांबडी, काजूची वाडी, खऊसावाडी, केळीचीवाडी आणि उंबरमाळ ह्या पाच आदिवासी वाड्यांच्या आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येत एकत्र येत पेण पंचायत समितीवर हल्लाबोल केला. या पाचही आदिवासी वाड्यांना हक्काची ग्रामपंचायत, मतदानाचा अधिकार, रस्ता, पाणी, घरकुल योजना, गावठाण विस्तार योजना व इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी मोर्चेकर्यांशी चर्चा केली. या पाच आदिवासी वाड्यांची एक स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या आदिवासी बांधवांची पाण्याची प्रश्न मिटणार आहे. आदिवासींच्या बालकांच्या शिक्षणाकरिता अंगणवाडी ची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गटविकास अधिकारी पोळ यांनी मोर्चेकर्यांना दिली.
ज्यासाठी आम्ही स्वातंत्र्याचा लढा दिला ते स्वातंत्र्य आम्हाला दिसत नाही अशी खंत सैनिक डॉ.जी.जी.पारीख यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यावर या आदिवासी बांधवांची मतदान नोंदणी होऊन त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल. या ग्रामपंचायतीला वेगळा विकासनिधी मिळून हे आदिवासीबांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
26 जानेवारी पर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत व जलजीवन मिशन या दोन्ही कामांची सुरुवात न झाल्यास येत्या 26 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना तिरंगा फडकविण्यापासून रोखून सदर तिरंगा आदिवासी समाजातील व्यक्तीच्या हस्ते फडकविण्यात येईल असा इशारा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी दिला.
या मोर्चामध्ये स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी.पारीख, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ इंगळे, सुनील यशवंत वाघमारे, नीलम वाघ, ॲड. हेमंत शिंदे, ॲड.अक्षय गवळी,ॲड. विकास शिंदे, ॲड. लखन नाडेकर, श्रेयश ठोकळ, शैलेश कोंडसकर, संदेश ठोंबरे सचिन गावंड, राजू पाटील, मानसी पाटील, स्मिता रसाळ, सचिन पाटील, राजेश रसाळ, सतीश मोकल, प्रशांत सोमासे, अनंता गावंड, संतोष हापसे, महेश पाटील, राम राऊत, जयश्री म्हामनकर ज्योती पाटील, मनीषा वाघे, सुनील वाघमारे,नीलम नितेश वाघ, मंगल वाघमारे, सविता हीलम यांच्यासह आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.