माथेरान (मुकुंद रांजाणे) : आज माथेरानमध्ये इ रिक्षा बाबत असलेल्या विरोधक व समर्थक पाठीराख्यांमध्ये चर्चा करण्याकरिता माथेरान मधील कम्युनिटी सेंटर येथे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रिक्षास विरोध असणारे असंख्य पाठीराखे उपस्थित होते तर ई रिक्षासाठी आग्रही असणारे स्थानिक नागरिक ही मोठया संख्येने उपस्थित होते. परंतु रिक्षास विरोध असणारे स्थानिक अश्वपाल संघटनेचे पदाधिकारी मात्र अनुपस्थितीत असल्याचे दिसून आले.
1850 मध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये माथेरान पर्यटन स्थळाचा शोध लावला गेला ब्रिटिशांनी वसविलेल्या या पर्यटन शहरांमध्ये इंधनावर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरसकट बंदीचा कायदा केव्हापासून लागू होता त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी असलेले पर्यटन स्थळ अशी माथेरानची ओळख होती माथेरानमध्ये तेव्हापासून वाहन म्हणून घोडे व हात रिक्षांचा वापर केला जात आहे, परंतु मागील काही काळांपासून हात रिक्षा ओढणाऱ्या चालकांनी पर्यावरण पूरक बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा सुरू करावे यासाठी न्यायालयात प्रदीर्घ लढाई लढल्यानंतर माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आल्या हा माथेरानच्या पर्यटन इतिहासात ऐतिहासिक निर्णय ठरला परंतु या रिक्षा सुरू झाल्यानंतर अश्वपाल संघटनेने आपल्या व्यवसायावर गदा येत असल्याने ई रिक्षास विरोध दर्शविला आहे.
माथेरान मधील स्थानिक व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी ई रिक्षामुळे व्यवसायात वाढ झाल्याने समर्थन केले आहे. त्यामुळे समर्थक व विरोधक असा एक नवा वाद माथेरानमध्ये रंगला होता त्यामुळेच स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी स्थानिक नागरिकांच्या बैठकीचे आवाहन करत आज येथील कम्युनिटी सेंटर येथे चर्चासत्र बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये माथेरान मधील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता व वेगवेगळ्या स्तरावर आपल्या समस्या व मागण्या मांडल्या.आमदारांच्या स्वागतासाठी स्थानिक अश्वपाल संघटनेचे पदाधिकारी दस्तुरी नाक्यावर हजर झाले होते परंतु यावेळी चर्चासत्रात का उपस्थित राहिले नाहीत याबाबत तर्कवितर्क होत आहेत.
————————————–
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रिक्षा सुरू होणारच परंतु याद्वारे माथेरानचे पर्यटन ही वाढणार आहे पर्यटन वाढल्याने येथील स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याने ही रिक्षा ही येथील पर्यटनास महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे, आता जरी ई-रिक्षास विरोध होत असला तरीही रिक्षामुळे येणाऱ्या पिढी करिता शिक्षणाच्या रूपाने एक नवे दालन उघडणार असून त्याद्वारे माथेरानचा विकास नक्कीच होईल.
—आ. महेंद्र थोरवे
————————————–
माथेरानमध्ये ई रिक्षाच्या सेवेमुळे निश्चितपणे पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि हा होणारा बदल सर्वांनी स्वीकारायला हवा. इथला नागरिक आर्थिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ई रिक्षा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. आम्ही ई रिक्षाचे समर्थक आहोत भले नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्तेत आलो अथवा नाही आलो तरी चालेल परंतु गावाच्या विकासाला आमचे नेहमीच प्राधान्य राहील.
—मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष
Related