नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधकांचा सामना रंगला, बोलू दिलं जात नसल्यामुळे विरोधकांनी मागणी केली, पण तरीही बोलू न दिल्यामुळे, अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करू नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केल्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला.
सविस्तर वृत्त असे की, अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करू नका, असं वक्तव्य आमदार जयंत पाटील यांनी केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या संदस्यांनी आक्रमक होऊन जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येऊन आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.
दरम्यान विरोधीपक्ष नेते यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली, यावेळी विरोधीपक्ष देखील आक्रमक झालेले चित्र सभागृहात पहायला मिळाले. जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे विरोधीपक्षांनी सभात्याग केला.