पेण (राजेश प्रधान) : प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य गुरूवर्य (कै.) प्रभाकर तानाजी जोशी उर्फ नाना जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पेण येथे प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्राच्या व पेण आयुर्वेदिक डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुरू असलेली प्रभा आयुर्वेद रथयात्रा शनिवारी पेणमध्ये दाखल झाली. या रथयात्रेचे पेण शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या रथयात्रेच्या माध्यमातून पेणमधील सुमारे 300 पेक्षा अधिक रुग्णांवर मोफत आयुर्वेदिक उपचार करून मोफत औषधे देण्यात आली.
पेण तालुक्यातील पेण आयुर्वेदिक डॉक्टर्स वेल्फेअर असोशिएशनच्यावतीने ही संधी पेणकरांना उपलब्ध करून देण्यात आली. पेणनगरीच्या प्रवेशद्वाराजवळून निघालेल्या या भव्ययात्रेचे स्वागत पेण महात्मा गांधी मंदिर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर पेण आयुर्वेदिक डाॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैद्य आशिर्वाद मोकल, वैद्य दत्तात्रेय दगडगावे, रायगड जिल्हा समन्वयक वैद्य अक्षय ठाकूर,ज्येष्ठ वैद्य आनंद साठे, वैद्य सुश्रुत साठे, वैद्य.चेतन म्हात्रे, वैद्य चारुदत्त कुलकर्णी, वैद्य मिलिंद कुलकर्णी, वैद्य उद्धव शिरकांडे, वैद्या लता परांजपे,वैद्या.अंजली कुलकर्णी व वैद्या.सायली कदम हे उपस्थित होते.
वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैद्य. मयुरेश कुलकर्णी, वैद्या.सुप्रिया म्हात्रे-चिखलेकर,वैद्य.नीता कदम, वैद्य.मितेश पाटील, वैद्य.पल्लवी म्हात्रे,वैद्य.सिकंदर भोईर,वैद्य.एन.डी.राठोड, वैद्य.महेश मोकल,वैद्य.शिल्पा ठाकूर,वैद्य.मीनल मोकल,वैद्य.दीपा वैद्य,वैद्या.विनया कांबळे,वैद्य.शुभम म्हात्रे आदी उपस्थित होते.
शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी गांधी मंदिर येथील शिबिरात पेण तालुक्यातील 300 हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून काहींना अग्नीकर्म,विद्धकर्म द्वारे उपचार पद्धती देऊन आयुर्वेदातून सुद्धा लवकरात लवकर बरे होता येते हे तज्ञ वैद्यांनी दाखवून दिले.
यामध्ये संधिवात, मुळव्याध, पोटाचे विकार, दमा, त्वचा विकार ,मुतखडा, श्वसनाचे विकार, स्त्रियांचे आजार, मणक्याचे आजार, अर्धशिशी, पित्ताचे आजार व यापेक्षाही इतर आजारांवर उपचार पद्धती देऊन रुग्णांना दिलासा दिला.तसेच या शिबिरात ७ दिवसांची आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात आली.
गुरुवर्य वैद्य स्व.प्रभाकर तानाजी जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्र ही रथयात्रा राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. आयुर्वेद आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अधिकाधिक रुग्णांना लाभ व्हावा या उद्देशाने ही रथयात्रा राज्यातील विविध भागात आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करेल असे यात्रेचे मुख्य प्रबंधक दत्तात्रेय दगडगावे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.