आलिया भट्टला RRR या बिग बजेट चित्रपटातून नारळ दिला

मुंबई : बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी RRR नावाचा धमाकेदार बिग बजेट चित्रपट हाती घेतला आहे. देशभरातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आगामी चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव सर्वात वर आहे. हा चित्रपट कोरोनामुळे 2020 साली प्रदर्शित केला जाणार नाही. चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीझर हे मार्च महिन्यातच प्रदर्शित करण्यात आले आहे. मात्र या चित्रपटासाठी एक मोठा बदल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट हिला या चित्रपटातून बाहेर काढल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटलंय की आलिया भट्ट हिच्याऐवजी प्रियांका चोप्रा हिची या चित्रपटात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

घराणेशाही म्हणजेच नेपोटीझमचा वाद उफाळल्याने आलिया भट्टला चित्रपटातून वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे. आलिया भट्ट हिच्या सडक-2 चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना नाकारणाऱ्या म्हणजेच डिसलाईक करणाऱ्यांच्या संख्येने उच्चांक प्रस्थापित केला आहे. हा उच्चांक पाहिल्यानंतर या चित्रपटातून आलिया हिला वगळण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.