उरण ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आज उरण विधानसभाचे विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी काळाधोंडा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनीत भोईर, कोट ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष निलेश भोईर यांनी काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपूत्र असलेल्या शेतकऱ्यांची कशी फसवणूक झाली ते सांगितले तसेच विविध मागण्यांचे निवेदन यावेळी विद्यमान आमदार महेश बालदी यांना देण्यात आले.
विविध मागण्यांसाठी 8 जानेवारी 2021 पासून काळाधोंडा येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे. धरणे आंदोलन व साखळी उपोषणाचा आज 36 दिवस आहे.या दिवशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवी भोईर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विविध समस्यांची दखल घेत एक लोकप्रतिनिधी म्हणून काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे व चालू असलेल्या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे आमदार महेश शेठ बालदी यांनी सांगितले.लवकरच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून प्रश्न निकाली काढणार असल्याचे तसेच न्यायालयीन लढ्यासाठी तयार राहण्याचे व त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. यावेळी काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.