पोलादपूर (शैलेश पालकर) इंग्रजी भाषा काळाची गरज असली तरी इंग्रजी अनिवार्य असू नये तसेच मराठी भाषेजवळ असलेली आपली नाळ तोडू नये, असे आवाहन संमेलनाध्यक्ष सुरेश मेहता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने दशानेमा सभागृह महाड येथे राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवारी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.
या संमेलनाचे उद्धाटन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी केले. यावेळी आ.भरत गोगावले, संमेलनाचे अध्यक्ष सुरेश मेहता, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक,कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ.अ.ना.रसनकुटे, कोकण प्रदेश उपाध्यक्षा डॉ.अलका नाईक, स्वागताध्यक्ष मंगल गांधी, काव्य संमेलनाध्यक्ष रिचा गांधी, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष संदिप तोडकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विशाल मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगीता लंघे, कोमसाप रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत राजमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन आणि पाहुण्यांचे स्वागत करून या साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. यावेळी मान्यवरांचे स्वागत देखील सन्मानचिन्ह आणि पुस्तक भेट देऊन करण्यात आले.
यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी देशातील समस्या मांडण्याचा प्रयत्न साहित्यातून झाला पाहिजे असे मत व्यक्त करत आज सर्वसामान्य माणूस ज्या प्रकारे जीवन जगत आहे त्याचे वर्णन साहित्यातून अनेकदा येते. मात्र, त्याला न्याय देण्याचे काम देखील साहित्यातून झाले पाहिजे, असे मत सुधीर शेठ, डॉ.अ.ना.रसनकुटे, फुलचंद नागटिळक यांनी मांडले. तर डॉ.अलका नाईक यांनी देखील साहित्यातून सामान्य माणसाचे प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे काम साहित्यिकाने केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सुरेश मेहता यांनी, सध्या नवयुवक साहित्यापासून दूर जात असून त्याला पुन्हा या क्षेत्रामध्ये ओढणे हा साहित्यिकांसमोरचा प्रश्न असल्याचे सांगून इंग्रजी भाषेचा वापर काळाची गरज बनली असली तरी याकरिता मराठी भाषेचा बळी दिला जाऊ नये, असे सांगून देशातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, गरीब, वंचित, शोषित, पिडीत यांसारख्या देशाचा कणा असलेल्या लोकांचा जीवनपट साहित्यातून उमटला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी दुपारच्या सत्रांत राज्यातील विविध भागातून आलेल्या कवयित्री आणि कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये जावळी तालुका महिला अध्यक्षा उज्वला कुंभार, पुणे शहर सहसचिव जयश्री श्रोत्रीय, प्रसिध्द कवयित्री सिंधुताई साळेकर,महाराष्ट्र राज्य परिषद, पुणेचे दिग्दर्शक शिवाजी कुंभार, अ.भा.म.सा.प.पुणेचे सदस्य विलास कुंभार, अ.भा.म.सा.प.पुणेचे जिल्हा कार्याध्यक्ष व अभिनेता ज्ञानेश्वर धायरीकर, बोरीवली अध्यक्ष सायली पिंपळे, राजापूर तालुका उपाध्यक्षा श्रध्दा पाटील, मंडणगड तालुका अध्यक्षा संगीता पंदीरकर,विश्व वंजारी साहित्य अध्यक्ष अनिल सांगळे याशिवाय राज्यभरातून आलेले कवी कमलाकर लोहार, मनीषा पवनारकर, अजयकुमार वंगे एकनाथ पवार, किरण मोरे, क.मु.मोगल, पार्वती घाडगे, महेंद्र विचारे, शशांक मोरे ,देविका शेवडे, सुवर्णा पवार, योगिता कोठेकर यांचा समावेश होता.हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मंगल गांधी, नेत्रा मेहता, संगीता कांबळे, नेहा तलाठी, निलांबरी घोलप, त्रिवेणी मराठे आदींनी मोलाचे सहकार्य केले.