नागोठणे (महेश पवार) : नागोठणे-रोहा मार्गावर सध्या भारत संचार निगमच्या इंटरनेट केबलचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे काम सुरु असतांनाच इंटरनेट केबल टाकण्यासाठी रस्त्याची साईड पट्टीचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने तिची दुर्दशा झाली आहे. तसेच रस्त्याची साईडपट्टी खोदल्यामुळे माती रस्त्यावर आल्याने मोठ्या वाहनांच्या रहदारीने उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकीस्वार, रिक्षा, मिनीडोर व इतर छोट्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
भारत संचार निगमच्या रोहा येथील दूरध्वनी केंद्रातून पेझारी-पोयनाड येथील दूरध्वनी केंद्रापर्यंत ही इंटरनेट केबल टाकण्याचे काम गेले काही दिवस सुरु आहे. मात्र हे काम करीत असतांना या कामाच्या संबधित ठेकेदाराने योग्य ती काळजी न घेता मनमानी करून सुरु ठेवलेल्या कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या इंटरनेट केबलचे काम करण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्टीला जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोलवर खड्डा करण्यात येत आहे. हा खड्डा खोदत असतांना त्यामधील माती रस्त्यावर येत आहे. मात्र खोदलेल्या खड्ड्यात केबल टाकल्यानंतर तो खड्डा बुजवितांना तो योग्य पद्धतीने न बुजविता थातुरमातुर पद्धतीने बुजविल्याने रस्त्याच्या साईडपट्टीची वाताहत झाली आहे. त्यामुळे या साईड पट्टीमुळे पावसाळ्यातही वाहनचालकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतांनाही या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रोहा उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी बांधकाम खात्याचे रोहा उपविभाचे अभियंता एम.एन. घाडगे यांनी सांगितले की, बीएसएनएल ला कामाची परवानगीची गरज नसते. तसेच रस्त्याच्या बाजूला करण्यात येणारे खोदकाम व रस्त्याचे नुकसान याची तातडीने पाहणी करुन संबधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल असेही घाडगे यांनी स्पष्ट केले.