माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानमध्ये अनेक वर्षांपासून पर्यटकांच्या सेवेत घोडे उपलब्ध आहेत. त्यामुळे घोडे हे एक महत्त्वपूर्ण आकर्षण मानले जाते. त्यातच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात काहीतरी नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तन महत्त्वाचे असते. येथील काही मंडळींची पिढ्यानपिढ्या हातरीक्षा ओढण्याची परंपरा कायम होती परंतु त्यांनाही आपल्या व्यवसायात बदल हवा होता त्यासाठी त्यांनी जवळपास बारा वर्षे शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर ई रिक्षा सारख्या वाहनांचे या दुर्गम भागातील पर्यटनस्थळावर आगमन झाले आहे.
यामुळे श्रमिक हातरीक्षा चालकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळणार असून त्यांच्या भावी पिढीला सुध्दा याच माध्यमातून सन्मानाचे जीवन जगता येऊ शकते. सध्यातरी या ई-रिक्षा तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू ठेवल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी साडेसहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी उपलब्ध असून दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वासाठी उपलब्ध आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थानिक असो किंवा पर्यटक, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, रुग्णांसाठी सुध्दा ही सेवा सुरू केली आहे.
सोमवार ते गुरुवार वेळ रात्री १० वाजेपर्यंत करावी अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांकडून केली जात आहे. कारण हॉस्पिटल तथा इतर कामासाठी रहिवासी मुंबई पुण्याला जातात तेव्हा त्यांना परत येताना रात्र होते त्यामुळे वेळ वाढवण्याची मागणी करीत आहेत.
इथे येणारा पर्यटक हा खासकरून घोडेस्वारी साठीच प्रामुख्याने येत असतो त्यामुळे हौशी पर्यटक या घोडेस्वारीचा मनमुराद आनंद लुटत असतात. अनेकदा वयोवृद्ध पर्यटकांना माथेरानमध्ये येण्याची प्रबळ इच्छा असताना देखील इथे स्वस्त आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था नसल्याने त्यांना यायला मिळाले नाही परंतु याठिकाणी ई रिक्षा सुरू झाल्याची बातमी सर्वदूर पसरल्याने सध्या इथे जेष्ठ, वयोवृद्ध,दिव्यांग पर्यटकांमुळे गर्दी वाढली आहे. त्यामुळे सर्वांना चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
तीन महिन्यांच्या प्रोजेक्ट नंतर ई रिक्षामुळे जे काही फायदे तोटे असतील, त्याचप्रमाणे कुणाच्या व्यवसायावर यामुळे काही परिणाम होत आहे किंवा कसे त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतरच उर्वरीत सर्व एकूण ९४ ई रिक्षा याठिकाणी सुरू होऊ शकतात.
————————————-
माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा ५ डिसेंबर रोजी सुरू झाली आहे तेव्हापासून ते ५ जानेवारी या एक महिन्याच्या कालावधीत जवळपास एक लाख पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत त्या माध्यमातून नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
—सुरेखा भणगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद