ई-रिक्षा विषयी आ. महेंद्र थोरवे ‘या’ तारखेला माथेरान करांशी साधणार संवाद

tharave
माथेरान (मुकुंद रांजाणे) :  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच माथेरान याठिकाणी नगरपालिकेने दि. 5 डिसेंबर पासून सात रिक्षां सोबत पायलट प्रोजेक्टला सुरुवात केली आहे. मंगळवारी (दि.२०) माथेरान व्यापारी संघटना व श्रमिक रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन ई रिक्षा सुरू करण्यासाठी त्यांच्या परीने शक्य तेवढे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक ,पर्यटक व स्थानिक रहिवाशी या ई रिक्षाच्या सेवेमुळे समाधान व्यक्त करीत असल्याचे सांगितले, दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड हे गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने नागरिकांची होणारी दमछाक यानिमित्ताने आता थांबली आहे. तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्ट नंतर कायमस्वरूपी ई रिक्षाची सेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची मागणी माथेरानच्या शिष्टमंडळाने केली.
 हात रिक्षाच्या अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटना गेल्या बारा वर्षापासून संघर्ष करीत आहे. ब्रिटिश काळा पासून माथेरानला वाहनांना बंदी आहे. माथेरान प्रदूषण मुक्त रहावे असा उद्देश आहे. ई रिक्षा ह्या प्रदूषण मुक्त असल्याने हात रिक्षा चालकांना देण्यात याव्यात यासाठी संघटनेचे सचिव तथा निवृत्त शिक्षक सुनिल शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने दि. 12 मे रोजी ई रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले. सध्या सात रिक्षांसोबत पायलट प्रोजेक्ट सुरू असून येथील चढ उताराच्या रस्त्यावर कोणत्या कंपनीच्या रिक्षा चालू शकतात याचा अभ्यास करून अहवाल राज्य सरकार कोर्टाला सादर करणार आहे.
यावेळी पालिकेचे माजी उपनगराध्य आकाश चौधरी, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, सचिव सुनिल शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी , राकेश चौधरी यांनी चर्चेत भाग घेतला.
माथेरान साठी ई रिक्षाचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याने आमदार महेंद्रशेठ थोरवे  स्थानिकांसोबत संवाद साधण्यासाठी दि 2 जानेवारी रोजी माथेरानला भेट देणार आहेत.
 काही व्यक्ती ई रिक्षा बंद करण्यासाठी  शासनाकडे खोटेनाटे पुरावे सादर करीत आहेत ई रिक्षा सुरू झाल्याने 1500 कुटुंबांची उपासमार सुरू झाल्याचे सांगितले जाते वस्तुस्थितीत माथेरानला 935 कुटूंब आहेत सर्वांना नेहमीप्रमाणे धंदा मिळत आहे.
———————————–
ई रिक्षा सुरू झाल्याने माथेरानकरांची  पायपीट थांबली असून माथेरानच्या विकासाच्या दृष्टीने मोठा बदल झाला आहे. त्याच बरोबर अश्वपालक देखील मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या दृष्टीने सर्वसमावेशक तोडगा निश्चित काढुया
—आमदार महेंद्र थोरवे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *