माथेरान (मुकुंद रांजाणे) : मा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरान नगरपालिकेने दि 5 डिसेंबर पासून ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टला सुरवात केली आहे. ई-रिक्षा मुळे ज्येष्ठ नागरिकांची पायपीट वाचली आहे.दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने ज्येष्ठ नागरिकांची अक्षरशः दमछाक व्हायची परंतु सद्यस्थितीत ई-रिक्षाच्या महत्वपूर्ण सेवेमुळे दहा मिनिटात गावात यायला मिळते.
याच मुख्य स्वस्त आणि सुरक्षित वाहतूक सेवेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक वाहतुकीचा सुखद अनुभव घेत आहेत. भविष्यात ही सेवा अशीच कायमस्वरूपी सुरू रहावी यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिभाई मेहता, उपाध्यक्ष अनंता शेलार , अशोक पवार,रमेश जोशी, शफिक भाई शेख यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची नगरपरिषदेच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले.
माथेरानच्या हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी यासाठी निवृत्त शिक्षक सुनिल शिंदे यांनी श्रमिक रिक्षा संघटने तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दि 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने ई रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले , राज्य सरकारने माथेरानच्या रस्त्यावर कोणत्या रिक्षा चालू शकतात याचा अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्ट ची मागणी केली होती.
राज्य सरकारने कोर्टाला अहवाल सादर करताना ज्येष्ठ नागरिकांची मागणी प्रामुख्याने मांडावी अशी मागणी हरिभाई मेहता यांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे केली आहे.
Related