अलिबाग : राज्यातील विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (सर्व्हिसेस प्रेपरेटरी इन्स्टिट्यूट) स्थापना केली आहे. या संस्थेकडून सैनिकी सेवापूर्व शिक्षण 47 व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्याकडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहित मुलगा असावा. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, त्याचा जन्म 01 जानेवारी 2007 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान झालेला असावा. तर मार्च/एप्रिल/मे 2023 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असावा. म्हणजेच जून 2023 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. तसेच उमेदवार हा सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा.
यूपीएससी ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे (एन.डी.ए) आणि भारतीय नौसेना प्रबोधिनी, एझिमला, केरळ (आय.एन.ए.) येथील प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेल्या शारिरीक निकषास पात्र असावा. हे निकष यूपीएससी तथा सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवाराची उंची 157 सेंटीमीटर, वजन 43 किलोग्रॅम, कमीत कमी छाती न फुगवता-74 सेंटीमीटर, फुगवून-79 सेंटीमीटर, रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा, चष्मा (-) 2.0 D पेक्षा जास्त नसावा.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्याद्वारे केली जाईल. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 9 एप्रिल 2023 रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 150 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यामध्ये गणिताचे 75 आणि सामान्य ज्ञानावर 75 गुण आधारित असतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता 8 वी ते 10 वी च्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला 1 गुण मिळेल. तसेच यशस्वी परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.spiaurangabad.com या वेबसाईटला भेट द्यावी. परीक्षा शुल्क रु.450 (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, किंवा नेट बँकींग इत्यादी द्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलान द्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2023 सायं.6.00 वाजेपर्यंत असणार आहे. उमदेवारांना परीक्षेचे हॉल तिकीट दि.30 मार्च 2023 रोजी संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. परीक्षा संबंधीत सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन प्रभारी संचालक मेजर (निवृत्त) एस.फिरासत यांनी केले आहे.