सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “कम्युनिकेशन गॅप”

“अरे! सॉरी… तुला सांगायला विसरलो.”
योगेशच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आणि शमिता रागाने बेडरूम मध्ये निघुन गेली.
आज काल शमिता आणि योगेश मध्ये बोलणंच होत नाही. जेव्हा तिला त्याच्याशी बोलायचं असतं, तेव्हा तो नेहमी बिझी असतो. कधी काम असतं.. तर कधी कोणाचा फोन असतो.. आणि मग फोन वर तास तासभर बोलणं होत राहतं.. त्याचे मित्र.. त्यांची फॅमिली.. सगळे गप्पा मारत राहतात.. कधी योगेश कोणाशी तरी फोन वर चाट करत असतो.. शाळेतले, कॉलेज मधले मित्र मैत्रीण ऑनलाईन असतात.. मग शमिता काही बोलली तर त्याच्या लक्षातच राहत नाही…
आणि जेव्हा तो फ्री होतो.. तेव्हा शमिता कामात असते.. कधी घर आवरणं, जेवण बनवणं.. कधी कपडे धुणं, भांडी घासणं.. त्यात वर्क फ्रॉम होम..! ऑफिस च्या कामचं लोड वेगळं.. ह्या सगळ्यात शमिता आणि योगेश इतके गुरफटुन जातात की एकमेकांशी बोलायला त्यांना वेळच मिळत नाही.. आणि जरी मिळाला.. तरी ते इतके दमलेले असतात.. की बोलायची ताकदच राहत नाही..
आणि ह्या सगळ्या मुळे त्या दोघांमध्ये एक कम्युनिकेशन गॅप निर्माण झाला. शमिता काही बोलायला जायची.. तर योगेश कामाच्या नादात तिचं बोलणं फक्त ऐकायचा.. समजून घेऊन लक्षात ठेवणं त्याला कठीण व्हायचं.. आणि कित्येकदा तो वेगवेगळे प्लॅन करायचा.. आणि शमिताला सांगायला विसरायचा..

आज ही हेच झालं..! शमिताच्या आईचा कॉल येऊन गेला. तिने शमिताला फोन करायला सांगितला होता. खुप महत्वाचं बोलायचं होतं. मित्रांशी मेसेज वर बोलण्याच्या नादात योगेश निरोप द्यायला विसरला..! आणि शमिताने नंतर सहज आईला फोन केला.. तेव्हा आई तिला ओरडली.. “अर्जन्ट म्हंटल्यावर आत्ता फोन करतेस का???”
शमिताला आधी समजलंच नाही.. की आई का चिडली…!
नंतर सगळा प्रकार लक्षात आल्यावर शमिताने योगेशला विचारलं.. आणि त्यावर त्याची साधी रिएक्शन..
“अरे ! सॉरी.. तुला सांगायला विसरलो..!”

हे आणि असे अनेक किस्से योगेश आणि शमिता मध्ये घडत होते.. आणि त्यामुळे खुप वेळा शमिताला योगेशचा राग येत होता. तिला त्याच्याशी बोलावं असं वाटेच ना.. हळूहळू तिने त्याच्या ह्या वागण्यावर चिडणं बंद केलं.. योगेशशी बोलणं ही बंद केलं.. कारण कधी ही असा प्रसंग घडला.. योगेश शमिताची कोणतीही गोष्ट विसरला.. तर मी कामात होतो ना.. मी काय मुद्दाम विसरतो का? हेच म्हणायचा..!
पण शमिताला दिसत होतं… कामा पेक्षा जास्त वेळ त्याचा मित्रांना, नातेवाईकांना मेसेज / विडिओ कॉल करण्यात जात होता. आणि त्यामुळेच तिने त्याच्याशी बोलणं कमी केलं होतं.

योगेश सगळ्यांशी बोलताना हा विचार करायचा की ‘शमिता तर चोवीस तास सोबत आहे.. थोडा वेळ दुसऱ्यांना दिला तर काय बिघडलं!’
आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात एक दुरावा निर्माण झाला. कम्युनिकेशन गॅप निर्माण झाला.

कित्येकदा असंच होतं.. एखादी व्यक्ती सतत आपल्या सोबत असते.. म्हणून आपण तिचा विचार जरा कमी करतो.. थोडा वेळ दुसऱ्या कोणाला दिला तर काय बिघडतं.. हा विचार आपण करतो. आणि नेमका थोडा थोडा करत किती वेळ गेला हे आपल्या लक्षातच येत नाही..!
आणि मग आपल्या हक्काच्या – जवळच्या व्यक्तिपासुन आपण नकळत दूर होऊ लागतो.
कम्युनिकेशन जर नीट होत नसेल तर ते नातं, ती व्यक्ती दुरावतेच.

म्हणून कधी ही कोणालाही गृहीत धरू नये. जेवढे कष्ट आपण एखादं नातं बनवायला घेतो.. तेवढेच कष्ट नातं टिकवायला घेतले तर कधीच कम्युनिकेशन गॅप निर्माण होणार नाही. आणि नाती दुरावणार नाहीत.ज्यामुळे नात्यांना एक मजबूती मिळेल.

– के. एस. अनु