कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील कर्जत- कल्याण रस्त्यावर शेलू गावाच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला झाडीमध्ये एक पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. शेलू गावातील देवीच्या मंदिरात यात्रा भरत असते आणि त्या यात्रेसाठी साफसफाई करताना हा मृतदेह स्थानिकांना आढळून आला आहे. नेरळ परिसरात असे अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेलू गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला झुडपात पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. शेलू गावात पौष महिन्यात देवीची यात्रा भरते आणि त्या यात्रेसाठी दुकाने, खेळण्याचे साहित्य उभे करण्यासाठी साफसफाई केली जात आहे. २१ डिसेंबर रोजी ती कामे सुरु असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झाडीमध्ये दुर्गंधी येत असल्याने तेथे पाहण्यास गेले असता मृतदेह आढळून आला. त्यानंतर नेरळ पोलिसांना माहिती देताच तात्काळ पोलीस उपअधीक्षक विजय लगारे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तेथे पोहचले मृतदेह हा किमान आठवडाभर टाकण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
तो मृतदेह पुरुष जातीचा असून संपूर्ण कुजलेल्या स्थित आढळून आल्याने पोलिसांना देखील त्याबाबत अंदाज येणे कठीण होऊन बसले आहे. दुसरीकडे त्या मृतदेहाच्या वयाचा अंदाज पोलिसांनी काढला असून साधारण ३५ ते ४० वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या अज्ञात व्यक्तीच्या अंगावर जीन्स पॅन्ट आणि शर्ट असून मृतदेह खून करून टाकण्यात आला असावा असे पोलीस सांगत आहे.
अशाप्रकारे याच महिन्यात नेरळ माथेरान घाटात मुंबई जुहू येथील वीणा प्रभुवनदास कपूर यांचा मृतदेह आढळून आला होता तर ३ डिसेंबर रोजी कशेळे – नेरळ रस्त्यावर अपघात करून कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स चे मालक हरीश राजपूत यांचा खून करून रस्त्याच्या खाली टाकण्यात आले होते. तर काही महिन्यापूर्वी कळंब नेरळ रस्त्यावर पोही गावाजवळ देखील पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीचा आढळून आला होता. त्यामुळे कर्जत तालुक्यातील रस्ते गुन्हेगारी लोक मृतदेहाहंची विल्हेवाट लावण्यासाठी निर्मनुष्य जागेचा वापर करतात काय? याबद्दल स्थानिकांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली आहे.
——————————
शेलू हे गाव कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असून त्या ठिकाणी पुढे ठाणे जिल्ह्याची हद्द सुरु होते. त्यामुळे आमच्या बहगत मागील वर्षभरातील हा तिसरा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसांनी शेलू येथे तात्पुरती पोलीस चौकी सुरु करावी. पूर्वी अशी चौकी सुरु करण्यात आली होती आणि त्यावेळी रात्रीच्या वेवेळी पोलिसांचा बंदोबस्त तेथे असायचा.