कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुका असल्याने मतदारांमध्ये यावेळी मतदान करण्यासाठी मोठा उत्साह होता. या निवडणुकीत मतदारांनी उत्साहात मतदान केले. तर वावलोळी ग्रामपंचायत मध्ये पोसरी येथील मतदान केंद्रावर चक्क बोहल्यावर चढण्यास निघलेला नवरदेव तरुण आधी मतदान आणि नंतर लग्न असे ठरवून मतदान केंद्रावर पोहचला.
कर्जत तालुक्यातील उकरुल, मांडवणें, कोंडीवडे, वावलोळी,कळंब,दहीवली तर्फे वरेडी आणि वेणगाव या सात ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच आणि तेथील 54 सदस्य पदांसाठी निवडणूक होत आहे.त्यासाठी आज सात ग्रामपंचायत मधील 25 मतदान केंद्रांवर घेण्यात आले.त्यातील वावलोळी, उकरुळ, मांडवणे, कोंदीवडे या चार ग्रामपंचायत मध्ये तीन प्रभागात मतदान घेण्यात आले.
तर कळंब ग्रुप ग्रामपंचायत मध्ये पाच तर वेणगाव आणि दहीवली ग्रामपंचायत मध्ये चार प्रभागात मतदान घेण्यात आले.त्या सर्व 25 मतदान केंद्रात कुठेही मतदान यंत्र बंद झाल्याची घटना घडली नाही. सात ग्रामपंचायत मधील थेट सरपंच पदासाठी 20 उमेदवार रिंगणात असून सात ग्रामपंचायत मधील एकूण 69 सदस्य यांच्यापैकी 15 सदस्य बिनविरोध निवडले गेले असल्याने आज 54 जागांसाठी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका होत असल्याने मतदारांनी सकाळ पासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती.
नवरदेव मतदान करण्यासाठी…
निलेश रामदास राजेशिर्के यांचे आज लग्न असून पोसरी गावातील या तरुण मतदाराने आज आपल्या लग्नाची वेळ समीप आलेली असताना देखील मतदान केंद्रावर जावून रांगेत उभे राहून मतदान केले.त्यावेळी पोसरी मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले तेथील ग्रामस्थ कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील या तरुण मतदाराचे कौतुक केले.निलेश राजेशिर्के यांनी मतदान करण्याचे कर्तव्य लक्षात घेवून आधी मतदान मग लग्न हा मेसेज या निमित्ताने लोकशाही बळकट करण्यासाठी महत्वाचा आहे हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उमेदवारांना ओळखपत्र…
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत मधील निवडणूक लढवणार असलेले उमेदवार यांना निवडणूक प्रशासन यांच्याकडून ओळख पत्र दिले जातात. मात्र यावेळी बहुतेक ग्रामपंचायत मधील उमेदवार यांना त्या त्या ग्रामपंचायत मधील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ओळखपत्र दिली नाहीत.त्याचा परिणाम मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस आणि निवडणूक यंत्रणा यांचे कर्मचारी यांना उमेदवार म्हणून कोणी ओळखत नव्हते.त्यामुळे उमेदवार आणि पोलीस यांच्यात बहुतेक मतदानकेंद्रावर शाब्दिक बाचाबाची होत होती.उमेदवार यांना ओळख पत्र नसल्याने मतदान केंद्राबाहेर बंदोबस्त साठी असलेले पोलीस त्या उमेदवार यांना तेथे उभे राहून देत नव्हते. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी तालुक्याचे नायब तहसीलदार तसेच स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी यांना देखील संपर्क साधले गेले.मात्र कोणीही समाधानकारक उत्तर द्यायचे नाही.
101 वर्षाचे आजीने केले मतदान….
दहीवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत मधील दहीवली गावातून प्रभाग एक मधील जिल्हा परिषद शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर भागीरथी जैतू तरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.त्यांचे वय 101वर्षे असून त्यांना त्यांचे पुत्र मतदान केंद्रावर घेवून आले,मात्र त्या आजींनी मतदान यंत्रात स्वतः मत नोंदवले.
कळंबमध्ये थेट सरपंच पदाचे उमेदवार चक्कर येवून पडले…
तालुक्यांतील कळंब ग्रामपंचायत मधील बाळासाहेबांची शिवसेना पक्षकडून थेट सरपंच पदाची निवडणूक लढवीत असलेले उमेदवार रामचंद्र बदे यांना मागील 15 दिवसात प्रचार आणि जागरण यांचा त्रास झाला होता.त्याचा परिणाम आज सर्वत्र मतदान सुरू असताना त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना खुर्चीत बसलेले असताना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले.त्यांना तात्काळ कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना बदलापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातून देण्यात आली.
सरासरी 90टक्के मतदान
कर्जत तालुक्यात दुपारी साडे तीन पर्यंत 75 टक्के मतदानाची नोंद झाली होती.त्यानंतर शेवटच्या दोन तासात देखील मतदारांचा उत्साह दिसून येत होता त्यामुळें सरासरी 90 टक्के मतदान कर्जत तालुक्यातील सर्व सात ग्रामपंचायत मध्ये झाले आहे.
मतमोजणी 20 डिसेंबर रोजी सात ग्रामपंचायत मधील 25 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.त्या ठिकाणी सरासरी 90 टक्के मतदारांनी मतदान केले आहे.या सर्व एव्हीम मशीन कर्जत तहसील कार्यालयातील स्टाँग रूम मध्ये ठेवण्यात येणार आण त्या सर्व मतदान यंत्रांची मोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर दीड दोन तासात सर्व निकाल स्पष्ट होतील.