कर्जत (गणेश पवार) : माथेरानच्या डोंगरातील बिबट्याचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी बिबट्या आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात माथेरान घाटात देखील बिबट्याने टॅक्सी चालकाला दर्शन दिले असून धसवाडी मधील बैलाची शिकार केली आहे.
४ डिसेंबर रोजी नेरळ ग्रामपंचायत हद्दी मधील धसवाडी भागातील शेतकरी हरिदास लक्ष्मण आखाडे यांचा बिलाची शिकार बिबट्याने केली आहे. नेहमी प्रमाणे पहाटेच्या सुमारास चरायला सोडलेल्या जनावरांपैकी एका बैलवार बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले आहे. पहाटेच्या वेळी धसवाडी पासून ७०० मीटर अंतरावरील जंगलात सकाळी गवत कापण्यासाठी गेलेले असताना हरिदास आखाडे यांना आपल्या बैलावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे आढळून आले.
बिबट्याने त्या बैलाचा एक कान कापून नेला असून त्या बैलाच्या पाठीमागील शेपटीच्या बाजूला मांस ओढून नेले होते. त्याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल उमेश जंगम,वनपाल एस एच म्हात्रे यांनी घटनस्थळाची जाऊन पंचनामा केला.
त्यात आता नेरळ माथेरान टॅक्सी सेवा करणाऱ्या वाहनचालक राकेश पाटील हे ५ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता माथेरान येथून नेरळ येथे टॅक्सी घेऊन येत असतांना त्यांना नेरळ च्या माथेरान नाक्यापासून जेमतेम २०० मीटर अलीकडे लव्हाळवाडी भागातून थेट घाट रस्त्यावर आलेला बिबट्याच्या गाडीच्या प्रकाशात रस्त्यावर काही काळ थांबला. त्यानंतर मार्ग न दिसल्याने बिबट आल्या पावली पुन्हा लव्हाळावाडी कडे खाली उतरून परत गेला.