कर्जत : पोलिसांनी लावला राजेंद्र ज्वेलर्स मालकाच्या खूनाचा छडा, दोन आरोपी जेरबंद

aaropee-neral
कर्जत (गणेश पवार) : कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्सचे मालक हरीश तथा हरिसिंह राघोसिंह राजपूत यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी स्थानिक सावळे गावातील दोन तरुणांना अटक केली आहे. अन्य तीन ते चार आरोपी फरार असून त्यांचा शोध नेरळ पोलीस घेत आहेत.
कशेळे गावात मॅकॅनिकचे दुकान असलेला एक तरुण आणि त्याचा सावळे गावातील मित्र अशा दोघांना या खून प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून खुनाची माहिती मिळाल्यानंतर नेरळ पोलिसांनी सावळे गावातील त्या दोन्ही तरुणांना रात्री अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची वसई आणि आता सोलापूर येथे राहत असलेल्या छगन राम पटेल याच्यासोबत असलेल्या ओळखीमधून या खुनाचा प्लॅन करण्यात आला होता. पटेल हा सावळे गावाचा जावई असून त्यांचे आणि अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांचे चांगले संबंध होते. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या छगन पटेलने काही काम असल्यास गेम वाजवता येईल, असे सांगितले होते. त्यानुसार त्या सर्वांनीच कशेळे येथे राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाची रेकी केली होती.
छगन पटेल याने सापळा रचला आणि प्लॅननुसार सावळे गावातील एका तरुणाला 3 डिसेंबरला पत्नीचे सोन्याचे गंथन गहाण ठेवून दोन लाख रुपये उलचण्यास सांगितले. त्यानंतर रात्री व्यापारी घरी जाण्यासाठी नेरळ स्टेशनकडे जात असताना त्याला लुटण्याचा इरादा करून सावळे गावातील एक तरुण कशेळे येथून हरीश राजपूत यांचा पाठलाग करीत आला होता. त्यानंतर वाकस गावाच्या अलिकडे दबा धरून बसलेल्या झायलो गाडीमधील लोकांना हरीश राजपूत यांना दाखवले. त्यानंतर राजपूत यांच्या बाईकच्या मागे झायलो असा पाठलाग सुरू होता.
शेवटी वाकस पुलाच्या पुढील वळणावर जिते गावाच्या हद्दीत झायलो गाडीने राजपूत यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर पटेल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राजपूत यांच्याकडील बॅग हिसकावून घेण्याच्या इराद्याने चाकूने वाऱ केले. मात्र राजपूत हे मजबूत शरीरयष्टीचे असल्याने ऐकत नव्हते. अखेर आरोपींनी त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला.
आरोपींनी राजपुत यांच्या पोटात 12 ठिकाणी तर मानेवर, पायावर आणि गुडघ्याजवळ वार करण्यात आले होते. खून करून ते पुन्हा कशेळे रस्त्याने पळून गेलेे. राजेंद्र ज्वेलर्स ते घटनास्थळ या दरम्यान कुठेही सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांसाठी या गुन्ह्याचा तपास करणे तसे आव्हानात्मक होते. मात्र गुप्तचर आणि स्थानिक परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी आव्हान पेलले.
पोलिसांच्या माहितीनुसार या गुन्ह्यात किमान तीन ते चार आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी रायगड पोलिसांची तीन पथके तैनात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक लगारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *