कर्जत : शिवसेनेचे चार, तर राष्ट्रवादी-शेकापचे दोन सरपंच विराजमान

karjat1

कर्जत : कर्जत तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या आणि त्या सर्व नऊ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच-उपसरपंचपदाची निवडणूक झाली. तालुक्यात वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या झाल्या होत्या. त्यातून शिवसेना पक्षाचे चार ग्रामपंचायतीमध्ये, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांचे प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडून आले असून, एका ठिकाणी सरपंचपद आरक्षित जागेमुळे रिक्त राहिले आहे. उपसरपंच पदावर शिवसेनेचे पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य विराजमान झाले आहेत.

तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ग्रामविकास आघाडी होती आणि तेथे ग्रामविकास आघाडीकडून सरपंच पदावर शिवसेनेचे अशोक किसन पवार यांची, तर उपसरपंच म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हर्षद अशोक भोपतराव यांची निवड झाली आहे. कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे बहुमत असून, तेथे शिवसेनेचे महेश सुरेश विरले हे सरपंच म्हणून, तर अस्मिता राजेश विरले हे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडले आहेत.

साळोखतर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी यांची आघाडी होती आणि सरपंच म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या स्मिता सोमनाथ फराट यांची, तर उपसरपंच म्हणून शिवसेनेचे मोहन विनायक वेहले यांची निवड झाली.

जिते ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे बहुमत असून, तेथे सरपंच म्हणून रेणुका मिरकुटे, तर उपसरपंच म्हणून तुकाराम भोईर यांची निवड झाली. वैजनाथ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत असून, सरपंच म्हणून स्नेहल दरेकर यांची, तर उपसरपंच म्हणून यमुना कातकरी यांची बिनविरोध निवड झाली.

भिवपुरी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे बहुमत असून, तेथे सरपंच म्हणून सेनेच्या संगीता माळी, तर उपसरपंच म्हणून हरिचंद्र मिसाळ यांची बिनविरोध निवड झाली.

हुमगाव ग्रामपंचायतीचे सहा सदस्य ग्रामविकास आघाडी म्हणून बिनविरोध निवडून आले होते. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण असलेल्या अनुसूचित जमाती राखीव ही जागा रिक्त असल्याने सरपंचपद पद रिक्त राहिले आहे, तर उपसरपंच पदावर गावकीमधून बिनविरोध निवडून आलेले सुनील बागडे यांची बिनविरोध निवड झाली, तर दामत ग्रामपंचायतीमध्ये सेनेचे माजी सरपंच गोपीनाथ राणे यांचे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पत्नी सुनंदा गोपीनाथ राणे या सरपंच पदाच्या निवडणुकीला उपस्थित राहिल्या नाहीत. तेथे सरपंच म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जाबीर अनिस नजे यांनी शिवसेनेचे रोहन पाटील यांचा ७ विरुद्ध ५ मतांनी पराभव करून सरपंच पद मिळविले, तर उपसरपंचपदाच्या निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीच्या नैना लक्ष्मण आखाडे यांनी सेनेच्या पूनम पाटील यांचा ७ विरुद्ध ५ मतांनी पराभव करून विजय मिळविला. ग्रामपंचायत सरपंच पदावर शिवसेनेचे चार, तर राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी दोन सदस्य निवडले गेले आहेत. उपसरपंच म्हणून शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि ग्रामविकास आघाडीचा एक, असे नऊ जण निवडले गेले.