सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “कर्तव्य”

“केलेच काय आहे तुम्ही माझ्या साठी… जर गरजा पूर्ण करता येत नसतील, तर जन्माला तरी कशाला घालता???”
तणतण करत एकोणीस वर्षांचा राहुल घराबाहेर पडला..
त्याची आई डोळ्यांत आलेले पाणी पदराने टिपत भिंतीला टेकली होती.. बहुधा तिला त्या भिंतीचाच आधार होता त्या क्षणी..!
वयात आलेल्या राहुलला मित्रांसोबत फिरायला जायचं होतं.. बी. कॉम. चं त्याचं फायनल ईयर होतं.. परत हे मित्र, ही मजा.. आयुष्यभर लूटता येणार नव्हती.. वर्ष संपलं की सगळे आपापल्या दिशेने निघुन जाणार होते. म्हणून मित्रांनी आऊटींगचा प्लान केला होता. पाच दिवस.. ट्रेकिंग, फिशिंग आणि मस्ती… आणि प्रत्येकाने स्वतः चा खर्च स्वतः करायचा होता.. साधारण पाच एक हजार रुपये दोन दिवसात भरायचे होते. म्हणजे राहुल जाणार हे पक्कं झालं असतं…
पण दोन दिवसात अचानक पाच हजार कुठून आणणार? राहुलचे वडील आजारी होते, त्यामुळे त्यांची नोकरी सुटली होती.. आईच्या कमाईवर घर खर्च आणि राहुलच्या वडिलांची औषधे.. त्यात राहुलची फि सुद्धा उधार घेऊन भरली होती. राहुलला आई कमवतेय हे दिसत होतं.. पण खर्च कुठे होतो, किती होतो.. हे दिसत नव्हतं..!

पैशांची सोय होऊ शकत नाही सांगितल्यावर राहुल चिडला.. आणि तोंडात येईल ते बोलु लागला.. “मी आलो होतो का सांगायला.. की घाला मला जन्माला..! गरजा पूर्ण करू शकत नाही तर जन्म तरी कशाला देता???? आता काय इज्जत राहील माझी मित्रांमधे!!”

त्या क्षणी इज्जती बद्दल तो बोलत होता.. जो स्वतः च्या आई वडिलांची इज्जत करू शकत नव्हता.. त्यांचा अपमान करत होता…

आज काल ही अशी वाक्ये जवळपास प्रत्येक वयात येणाऱ्या मुलाच्या तोंडी असतात.. आई वडील कधी कर्तव्य म्हणून.. तर अनेकदा प्रेम म्हणून.. मुलांच्या खुप गरजा पूर्ण करत असतात.. त्यांचे अनेक हट्ट, लाड पुरवत असतात… त्यामुळे कित्येकदा मुलांना नकार पचवायला त्रास होतो.. एखादी गोष्ट आई वडिलांनी केली नाही.. किंवा ते करू शकले नाही.. की त्यांना साधं कर्तव्य पूर्ण करता येत नाही… असा विचार हमखास आजकालच्या वयात येणाऱ्या मुलांच्या मनात येतो.. काही अपवादही असतात ह्याला.. ज्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव असते.. आणि ते आई वडिलांना समजून घेतात…

पण तरी ही… काही मुलांच्या मते आई बापाने आपल्याला जन्म देऊन आपल्यावर कोणते ही उपकार नाही केले… आणि आपल्या गरजा पूर्ण करणं हे त्याचं कर्तव्य आहे…!

त्यामुळे.. आता आपली कर्तव्ये नक्की काय आहेत हे आपल्या मुलांना सांगणे, समजवणे.. आणि मुलांची कर्तव्ये काय आहेत हे त्यांना उलगडून सांगणे हेच आई वडिलांचे महत्वाचे कर्तव्य आहे…
थोडी थोडी समज यायला लागली.. की मुलांमुलींना त्यांचे हट्ट कागदावर लिहून त्यातली खरी गरज कोणती.. आणि फक्त आवड म्हणून मागितलेली वस्तु कोणती.. हे वेगवेगळं मांडायला सांगायचं… त्याने त्यांना ही वयात येताना समजेल.. की वायफळ खर्च कोणते आणि गरजा कोणत्या..
त्यामुळे किमान अगदी तिशी ते पन्नाशी ओलांडताना आई बापाला गरजा पूर्ण करू शकला नाही हे बोल ऐकावे लागणार नाहीत… आणि त्यांनी त्यांची सगळी कर्तव्यं व्यवस्थित पूर्ण केली हे मुलांच्या मनावर ही बिंबवले जाईल… आता आपल्या कर्तव्यां मधे ही गोष्ट सुद्धा जोडायला हवी.. आणि नवीन पीढी वैचारिक बनवायला हवी…

  • के. एस. अनु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *