कविंद्र परमानंदांच्या जन्मगावातील मठासह पोलादपूरच्या मठाचे ऐतिहासिक सुशोभिकरण आवश्यक; शहरातील दूर्गसृष्टी लोप पावल्याने आकर्षण संपुष्टात

kavindar-parmanand
पोलादपूर (शैलेश पालकर) : छत्रपती शिवाजी महाराजांची कविश्वर आणि कविंद्र अशा उपाध्यांनी गौरविलेले कविंद्र परमानंद गोविंद नेवासेकर यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर तीर्थक्षेत्रापासून नेवासे या जन्मगावापासून केवळ 10 कि.मी.अंतरावरील खेडले परमानंद या गावातील स्मारक देखील पडझडीने जर्जर झाले असून पोलादपूर शहरातील ऐतिहासिक वास्तुला सध्या अत्याधुनिक कार्यालयासारखे स्वरूप आणून सुशोभित करण्यात आले आहे. या दोन्ही स्मारकांचे ऐतिहासिक स्वरूपाचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून पोलादपूर शहरातील दूर्गसृष्टी लोप पावल्याने या मठगल्लीतील स्मारकाचे आकर्षण संपुष्टात आल्याचे जाणवत आहे. यामुळे आधी ज्यांनी दूर्गसृष्टी उभारण्यासाठी लोकवर्गणी गोळा केली त्यांनाच याकामी पुन्हा एकदा संधी देण्यासोबत राज्यसरकारनेदेखील पोलादपूर आणि नेवासेगलतच्या खेडले परमानंद येथील दोन्ही स्मारकांना जिर्णोध्दाराद्वारे ऐतिहासिक चेहरामोहरा प्रदान करून कविंद्र परमानंदांचे यथोचित स्मरण करण्यास प्रवृत्त करावे, अशी मागणी व्यक्त होत आहे.
पोलादपूर शहरातील शिवकालीन स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा उपक्रम अखंडीतपणे सुरू आहे. मात्र, येथे गेल्या काही वर्षांपूर्वी सौंदर्यीकरणाचे काम रखडले. यानंतर साकारण्यात आलेल्या दूर्गसृष्टीकडे संबंधित संस्थेकडून अक्षम्य दूर्लक्ष झाल्याने दूरवस्था झाली.
विधानपरिषद सदस्य अशोक मोडक यांच्या निधीतून तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष मनोज भागवत यांच्या पाठपुराव्यातून 19 एप्रिल 1997 रोजी स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी झालेल्या सुशोभिकरणाचा उद्धाटनसोहळा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, बांधकाममंत्री नितीन गडकरी, राज पुरोहित आणि आ.अशोक मोडक यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी याठिकाणी समाधीस्थळ आणि वाचनालयाची खोली यांचा समावेश होता. यावेळी परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेख भिंतीवर रंगविण्यात आला होता. यानंतर ग्रामपंचायतीकडून रायगड जिल्हा परिषदेमार्फत तत्कालीन उपाध्यक्ष माणिक जगताप यांनी स्वामी परमानंद मित्र मंडळ या नोंदणीकृत संस्थेला दिवाबत्तीसाठी काही रक्कमेची तरतूद केली होती.याशिवाय, पोलादपूर ग्रामपंचायतीने काही रक्कम खर्ची घालून संरक्षण भिंत तसेच रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी पानिपतकार विश्वास पाटील यांनी सौंदर्यीकरणासाठी निधीची उपलब्धता केली. हे काम अपूर्ण असतानाच एका स्थानिक संस्थेमार्फत येथे दूर्गसृष्टी उभारण्याचे काम सुरू झाले. यानंतरही काही लोकप्रतिनिधींनी येथे निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने सदर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतील उत्साह कमी झाला.
साधारणत: तोरणा, सिंधुदूर्ग, राजगड, शिवनेरी, चाकण, लोहगड, पुरंदर, प्रतापगड, जंजिरा आदींसह 17 भूईकोट, जलदूर्ग आणि गडकिल्ले यांच्या प्रतिकृती उभारल्यानंतर याकामी पदाधिकाऱ्यांचे दूर्लक्ष होऊ लागले आहे. परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेखही या संस्थेकडून भिंतींना रंगसफेदीदरम्यान पुसण्यात आला असल्याबद्दल सातत्याने विचारणा होऊनही आम्ही पक्क्या स्वरूपात लेख लिहिणार असल्याची माहिती संबंधितांकडून दरवर्षी देण्यात येत आहे. यादरम्यान, स्थानिक कवी स्वामी परमानंद मित्र मंडळ या संस्थेकडून दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि आनंदनगरकडून चैत्र प्रतिपदेला गुढी उभारण्याचा उपक्रम नियमित होत आहे. 2013 च्या गुढीपाडव्यावेळी नववर्षशोभा यात्रेचे आयोजन करून यात्रेचे विसर्जन याठिकाणी गुढी उभारून करण्यात आले होते. यावेळी सदर पदाधिकारी व त्यांचे कुटूंबिय या सोहळयात सामील झाले होते. ग्रामस्थांच्या काही शंकांना उत्तरे देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिटीींगमध्ये देणगीदारांच्या नावाचा फलक व देणगीची रक्कम तसेच कोणत्या निधीतून सौंदयीरकरण व दृर्गसृष्टी साकार झाली याविषयांची चर्चा झाली.
पोलादपूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर याठिकाणचे स्थानिक नगरसेविका संगिता इंगवले आणि सध्याचे स्थानिक नगरसेवक प्रसाद इंगवले हा मुलगा व माजी नगरसेविका असलेल्या त्यांच्या आई यांनी संघटनात्मक कार्यासह या स्वामी कवींद्र परमानंद मठामधील उत्सव सुरू ठेवले.
शालिवाहन शके, 1551 शुक्लनाम संवत्सरे, उत्तरायणात शिशिर ॠतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे संस्कृत सुभाषितांमधून लिहून ठेवणाऱ्या कविंद्र परमानंदांनी शिवभारत अनुपुराण आणि परमानंद काव्य असे दोन संस्कृत ग्रंथ लिहिले. 9 मार्च 1673 रोजी स्वामी कविंद्र परमानंदांना भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोलादपूर येथे आगमन झाले होते. शिवराज्याभिषेकप्रसंगी स्वामी परमानंद यांनी एक मुद्रा तयार केली होती. मात्र, शिवराज्याभिषेकाआधी काही दिवस स्वामी परमानंदांना देवाज्ञा झाली.
पोलादपूर शहरातील आनंदनगरलगतच्या स्वामी कविंद्र परमानंद मठाचे स्वरूप आता अधिक आकर्षक होऊ लागले असले तरी ऐतिहासिक स्वरूपाचे रूपडं गमावल्याचे दिसून येत आहे तर कविंद्र परमानंद यांचे जन्मगांव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर तीर्थक्षेत्रापासून नेवासे या जन्मगावापासून केवळ 10 कि.मी.अंतरावरील खेडले परमानंद या गावातील स्मारक देखील पडझडीने जर्जर झाले आहे. ऐतिहासिक वास्तुला सध्या अत्याधुनिक कार्यालयासारखे स्वरूप आणून झालेले सुशोभिकरण जरी दृष्टीकोनातून खटकत असले तरी सुशोभिकरण झाले असल्याचे समाधान वाटत आहे. दुसरीकडे, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे जवळील खेडले परमानंद येथील स्वामी परमानंद यांची गढी अद्याप ऐतिहासिक वास्तुच्या खुणा घेऊन जर्जरतेतही परिचय देण्यासाठी ठाम उभी आहे. त्याठिकाणी अद्याप राज्यशासनाचे लक्षही गेले नसल्याने पोलादपूर आणि खेडले परमानंद येथील दोन्ही स्मारकांसाठी शिंदे फडणवीस सरकारने विशेष निधी व तरतूद करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *