कशेडी घाटातील दरीत कार कोसळली, चालक गंभीर तर 5 किरकोळ जखमी

accident-poladpur
पोलादपूर (शैलेश पालकर)  तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात मुंबईकडून खेडच्या दिशेने कार घेऊन जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली असल्याची घटना मंगळवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धामणदिवी गावाच्या हद्दीत घडली आहे.
मुंबई गोवा महामार्ग क्र. 66 धामणदिवी दत्तवाडी येथे ठिकाणी घाटकोपर ते पळचिल जाणारी इर्टीगा कार क्र.एमएच03 बीजे 0671 वरील चालक सतीश जगताप वय-35 वर्षे, रा.संभाजीनगर, कुर्ला, मुंबई यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस रस्ता सोडून कार खाली उतरून दरीमध्ये पलटी झाली. या अपघातात कारमधून वाहन चालकासह 7 व्यक्ती प्रवास करीत होते.
यामध्ये चालक सतीश जगताप हा गंभीररित्या जखमी असून दिपाली कर्नाळे वय 65 वर्षे, दामोदर कर्नाळे वय 70 वर्षे, साक्षी कर्नाळे वय 42, स्वराज कर्नाळे वय 12, राजेश कर्नाळे 38 या पाचही जणांना किरकोळ दुखापत झाल्याने सर्वांना तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *