पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील कातळी बंगला येथील कशेडी टॅप वाहतूक पोलीसांकडून अपघातावेळी मदत करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील देवदुतांचा जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक चांदणे, खेड जेसीस क्लबचे अध्यक्ष पराग पाटणे, पळचिलचे सरपंच मोरे, महामार्ग पोलीस केंद्र कशेडीचे प्रभारी वाहतूक पोलीस अधिकारी बोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रेनच्या साह्याने कशेडी घाटातील दरीत कोसळलेली वाहने बाहेर काढण्याकामी सहकार्य करणारे पोलादपूर शहरातील नूरी पालोजी यांचा विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत खेड तालुक्यातील भरणेनाका येथील संतोष गोपाळ सागवेकर, तुळशी येथील विलास धोंडू पाटणे, वेरळ येथील शिवाजी श्रीधर यादव, कुळवंडी येथील प्रसाद दिलीप गांधी आणि खेड जेसीस क्लबचे अध्यक्ष पराग पाटणे व सहकारी तसेच पोलादपूर तालुक्यातील पोलादपूरचे नूरी तथा दादाहयातपीर शेखअब्दुल्ला पालोजी, कशेडी येथील मुकुंद राजाराम मोरे, समीर प्रकाश मोरे व महेश भिवा रांगळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील विविध अपघातांच्या घटनांवेळी या व्यक्ती आणि संस्थानी केलेल्या मदतकार्याबद्दल गौरव करण्यामागे नागरिकांनी वाहतुक सुरक्षा काळामध्ये प्रबोधन करून केलेल्या जनजागृतीनुसार वाहतुकीचे नियम पाळून अपघात न होण्याबाबत काळजी घ्यायची आहे, असे आवाहन यावेळी महामार्ग पोलीस केंद्र कशेडीचे सहायक पोलीस उपनिरिक्षक बोडकर यांनी केले.