काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची खा. श्रीरंग बारणे यांनी घेतली भेट, प्रश्न लोकसभेत मांडण्याचे आश्वासन

uran16

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको व रेल्वेने संयुक्त रित्या रेल्वे प्रकल्पासाठी 1962 साली संपादित केले होते मात्र त्याबदल्यात शेतकऱ्यांना कोणताही मोबदला, नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या सिडकोने, रेल्वने मान्य केल्या नाहीत त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.शेवटी शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे,माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, JNPT चे विश्वस्त दिनेश पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी साखळी उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्या संदर्भात खासदार बारणे यांना निवेदन देण्यात आले.

uran17

काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडण्याचे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी साखळी उपोषणाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना दिला. एक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे माझे आद्य कर्तव्य आहे. शिवसेना तसेच महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास नेहमी प्राधान्य दिले आहे. शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या हिताला नेहमी प्राधान्य दिले आहे.त्यामुळे काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य असेल असे मत बारणे यांनी व्यक्त केले .भूसंपादनाच्या बाबतीत न मिळालेल्या नुकसान भरपाई संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करणार असल्याचे तसेच लोकसभेत या अन्यायाविरोधात आवाज उठविणार असल्याचे खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना काळाधोंडा येथील शेतकऱ्यांवर अन्याय झाले असून या अन्यायाविरोधात आपण मुख्यमंत्री यांना कळविणार असल्याचे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी, स्थानिक रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष नवनीत भोईर,कोट ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष निलेश भोईर, दिपक भोईर, हेमदास गोवारी, प्रकाश पाटील आदी पदाधिकारी,शेतकऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहर भोईर,JNPT चे विश्वस्त दिनेश पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांचे आभार मानले