कोलाड : मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काळ नदीच्या पुलावर जड वाहनांना प्रतिबंधही करण्यात आला आहे. तर लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे -निजामपूर-बोरवाडी-डालघर या पर्यायी मार्गाने वळवली आहे. राज्य महामार्ग विभाग, पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
गोरेगाव, ता. माणगाव येथे गोरेगाव पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सोन्याची वाडी नावाचे एक गाव असून काळ नदीच्या पुराच्या पाण्यामुळे या गावाच्या चोहोबाजूंनी पुराचे पाणी आल्याने गावांमध्ये 70 ते 75 लोक अडकले होते. रायगड पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभाग रायगडच्या बोटीने अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आत्ता पर्यंत 23 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. गोरेगाव येथील दत्त मंदिर याठिकाणी या लोकांना सुरक्षितपणे ठेवले आहे.
4 ते 6 ऑगस्ट या कालावधीत रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, पावसाने येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. माणगाव तालुक्यातील काळ नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले. गोरेगावनजीक काळ नदी किनारी धरणाजवळ असलेल्या वेळासकर फार्महाऊसमध्ये अडकलेल्या 25 नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले. या फार्महाऊसमध्ये वेळासकर कुटुंब आणि त्यांचे सहकारी वास्तव्यास होते.