कुंडलिका नदिवरिल पुलावर रस्ता उखडून स्टील बाहेर, प्रवाश्यांच्या जिवाला धोका,

कोलाड (श्याम लोखंडे) :  मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नजीक असणाऱ्या कुंडलिका नदिवरिल नवीन पुलावर रस्ता उखडून स्टील बाहेर पडले असुन, या बाहेर पडलेल्या स्टील मुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला, असून याकडे संबंधीत ठेकेदार व बांधकाम खाते यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कुंडलिका नदीवरील नवीन बांधण्यात आलेल्या पुलावर गेली आठ ते दहा दिवसापासून रस्ता उखडून स्टील बाहेर पडल्यामुळे  या महामार्गावरून प्रवास करतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तर टुव्हिलर व छोटे वाहन चालकांना स्टील बाहेर पडल्यामुळे तो वाहनात गुंतून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.पाऊस पडल्यामुळे उखडलेला रस्ता पावसामुळे भरल्यावर तर परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली दिसत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हे बाजार पेठेचे मध्यवर्ती ठिकाण असुन येथे मुंबई, गोवा, पुणे ,मुरुड,अलिबाग व इतर अनेक विभगातुन प्रवासी प्रवास करीत असतात. शिवाय या महामार्गावर अनेक पर्यटन स्थळे,अनेक औद्योगिक क्षेत्र, अनेक शाळा कॉलेज असल्यामुळे या महामार्गावरून असंख्य नागरिक प्रवास करीत असतात. लॉक डाऊनमुळे वाहतुकीचे प्रमाण कमी होते. परंतुु हळूहळू सोशल डिस्टन्सचा पालन करुन सर्व वाहतुक पूर्वपदावर येतांना दिसत आहे.

कुंडलिका नदीवरील जुना पूल नवीन बांधण्यासाठी कोसळला असून येणारी व जाणारी वाहतुक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरुन सुरु आहे. शिवाय या पुलावरुन पादचारी,सायकलवरून जाणारे नागरिक, या पुलावरुन येजा करीत असून या पुलावरिल रस्त्याचा अर्धा भाग उखडून या पुलाला वापरण्यात अलेला स्टील बाहेर पडला आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असुन संबंधित ठेकेदार व बांधकाम खाते यांनी त्वरित उपाययोजना करावी असे प्रवासी वर्गातुन बोलले जात आहे.