बोर्लीपंचतन (मकरंद जाधव ) : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथील संस्थापक रा.पां. दिवेकर माध्यमिक शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रप्रमुख भिकू पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या गुणवत्ता विकासासाठी गणित, इंग्रजी स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व,निबंध स्पर्धा, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नऊ प्राथमिक तर एक माध्यमिक अशा दहा शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धांमध्ये रा.जि.प.देवखोल शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून विविध पारितोषिके पटकावली.
आरुष सोलकर इ. पहीली याने गणित व इंग्रजी स्पर्धेत प्रथम क्रमांक, स्वरा सोलकर इ.दुसरी हिने इंग्रजी स्पर्धेत प्रथम व गणित स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तनय राऊत इ.तीसरी याने गणित व इंग्रजी स्पर्धेत प्रथम क्रमांक, आयुष अवेरे इ.चौथी याने इंग्रजी स्पर्धेत प्रथम तर पूर्वा अवेरे हिने गणित स्पर्धेत तृतीय क्रमांक,श्रेयश सोलकर इ.पाचवी याने इंग्रजी स्पर्धेत द्वितीय आणि विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत स्वयंपूर्ण घर या प्रतिकृतीसाठी प्रथम क्रमांक तसेच वक्तृत्व व निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. क्रीडा स्पर्धांमध्ये पूर्वा अवेरे दोरी उडी मध्ये प्रथम क्रमांक व पोता उडी प्रकारात द्वितीय क्रमांक,श्रेयश सोलकर याने तृतीय क्रमांक पटकावला.सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत पारंपारिक गीतनृत्य प्रकार नाट्यीकरणात शाळेचा प्रथम क्रमांक तर मिनल सोलकर हिने सोलो नृत्य प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला.
शाळेला मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती भोसले-माळवदे,उपशिक्षक राहुल गांगोडे व सर्व विजयी स्पर्धक विद्यार्थी यांचे देवखोल स्थानिक ग्रामस्थ व मुंबई मंडळ शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.