केंद्रीय आरोग्य सहसचिव लव्ह अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : यापूर्वी केंद्र सरकारमधील चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, आता तर आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशभरातील कोरोनाच्या स्थितीची आकडेवारी दररोज अग्रवाल प्रसिद्ध करत होते. कोरोना संसर्ग झाल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि गाईडलाइन्स नुसार मी घरीच आयसोलेटेड होत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य पथक तपासणी करणार आहे. तसेच माझ्या मित्रांना, सहकार्‍यांना तपासणी करण्याची विनंती आहे, असे ट्विट अग्रवाल यांनी केले आहे.

शुक्रवारी दिल्लीतील कोरोनामध्ये 1192 नवीन रुग्ण बाहेर आल्याने राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संक्रमणाची एकूण संख्या दीड लाखांवर गेली आहे. त्याच वेळी या साथीच्या आजारात एकूण 4,178 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या आरोग्यविषयक बुलेटिननुसार, कोरोनामध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण मृतांचा आकडा 4,178 झाला आहे.

दिल्लीत संक्रमित रूग्णांची संख्या 1,50,652 आहे आणि त्यापैकी 11,366 उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 5,882 लोक आपआपल्या घरी उपचार घेत आहेत. या कालावधीत आरटी-पीसीआर/ सीबीएनएटी/ र्ट्यूनॅट पद्धतीने 5,721 टेस्ट केल्या, तर अँटिजन किटने 9,324 सॅम्पलची टेस्ट करण्यात आली.

सध्या दिल्लीत 532 ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. दिल्लीत 1,35,108 रुग्ण बरे झाले आहेत किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत