नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहाना कोरोना बाधा झाली आहे. शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माझी तब्येत ठीक आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी.
५ ऑगस्टरोजी राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. मात्र त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते आता राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. दिल्लीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमित शाह सक्रीय झाले होते.
गेल्या काही दिवसात अमित शाह यांनी अनेक कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली आहे. त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. मात्र या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे दिसते. ट्विटरवर अनेक जणांनी अमित शाह यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत.